परळीतील ६ दशकांपासूनचे कामगार कल्याण केंद्र बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाहीतर ना. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभारू – डॉ. संतोष मुंडे

130
बीड नितीन ढाकणे 
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)
            शहरात गेल्या ६ दशकांपासून सुरू असलेले कामगार कल्याण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय कामगार कल्याण आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. हा निर्णय मागे घेतला नाहीतर ना. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभारू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
परळीत असलेले एकेक शासकीय कार्यालय हळूहळू बंद करणे किंवा इतरत्र  पळविण्याचा घाट घातल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या मागे नेमके कोणाचे षडयंत्र आहे हे तपासून पाहावे लागणार आहे. दरम्यान राज्याचे नेतृत्व करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे हे सातत्याने कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहेत त्यामुळे आताही या तुघलकी निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही मुंडेंनी सांगितले.
परळी शहरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दोन कामगार कल्याण केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहेत. परळी शहर कामगार कल्याण केंद्र आणि थर्मल काॅलनी कामगार कल्याण केंद्र अशी दोन्ही केंद्र सातत्याने कामगार कल्याण विषयक योजना, उपक्रम, प्रशिक्षण, आदीबाबतीत नेहमीच अग्रेसर राहून कार्यरत आहेत.परळी शहर कामगार कल्याण केंद्राची स्थापना १९५९ मध्ये झालेली आहे. गेल्या सहा दशकांपासून सुरु असलेले हे केंद्र प्रशासकीय निर्णयाचा बळी ठरले आहे.
परळी वैजनाथ तालुक्यातील विविध अस्थापनांमध्ये काम करणारे हजारो कामगार व त्यांच्याकुटुंबीयांना या केंद्रांच्या माध्यमातून  सेवा दिली जात आहे. अतिशय सजगपणे ही दोन्ही केंद्र सुरु असतानांच अचानकपणे प्रशासकीय ‘तुघलघी कारभारामुळे’ परळी शहर कामगार कल्याण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याच्या निर्णयाचे कल्याण आयुक्तांचे पत्र येउन धडकले आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
मंडळाचे प्रतिसाद नसलेले २२ केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत असताना वास्तविक परिस्थितीचा कोणताही विचार न करता परळी शहर कामगार कल्याण केंद्र बंद करण्यात येत आहे. वास्तविक परळी शहर कामगार कल्याण केंद्र हे सातत्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम करणारे केंद्र आहे. प्रत्येक योजना व उपक्रम प्रभावीपणे  राबविण्यात नेहमी अग्रेसर असणारे केंद्र आहे. यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांकडूनच वेळोवेळी उत्कृष्ट कामगिरीची बक्षिसे, प्रशंसापत्र, पारितोषिके देण्यात आलेली आहेत. तरीही प्रतिसाद नसलेल्या केंद्रांच्या यादीत परळी वैजनाथ शहर कामगार कल्याण केंद्राचे नाव आल्याने आश्चर्य व्यक्त होत असुन हा ‘तुघलघी प्रशासकीय कारभाचा’ नमुना तर आहेच सोबत परळीतील कार्यालये जाणीवपूर्वक बंद करण्याचा प्रशासनाचा डाव आहे असा घणाघाती आरोप डॉ. संतोष मुंडेंनी केला आहे.
दरम्यान याबाबत कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली असून शहरातील ७० वर्षापासून सुरू असलेल्या या केंद्रांच्या बंद होण्याने कामगारांचे नुकसान तर होणार आहेच त्याहीपेक्षा परळीकरांसाठी हा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा बंदचा निर्णय रद्द करून पूर्ववत परळी शहर कामगार कल्याण केंद्र कायमस्वरूपी सुरू राहील यादृष्टीने राज्यस्तरीय प्रयत्न होणे गरजेचे बनले असल्याचेही मुंडे म्हणाले.
कामगार  मंडळ परळी येथून जमा करते लाखो रूपयांचे निधी
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत परळी शहर व परिसरातील विविध आस्थापनेतील कामगार व व्यवस्थापनांकडून लाखो रूपयांचा निधी जमा केला जातो. कामगाराकडून १२ रूपये तर एका कामगारपोटी आस्थापनेकडून २४ रूपये निधी घेतला जातो. यात साखर कारखाने, विज कंपन्या,  बँका, ऑईल मिल, एसटी महामंडळ, खाजगी कंपन्या,  कापड दुकाने,  पेट्रोल पंप,  कापूस पणन,  दुध डेअरी यासह अनेक छोट्या मोठ्या उद्योगांकडून निधी जमा केला जातो.
कामगार कल्याण केंद्र बंद केल्यानंतर ही हा निधी भरणे बंधनकारक आहे.
चौकट
केंद्राचा लाभ मिळणारी अस्थापने…
परळीतील विविध अस्थापनांमध्ये काम करणारे कामगार व कामगार कुटुंबियांना लाभ मिळतो.
● परळी एस. टी. कामगार
●आॅईल मिल कामगार
● वैद्यनाथ सह. साखर कारखाना कामगार
●महावितरण कामगार
● महापारेषण कामगार
● बँक कामगार
● जीवन प्राधिकरण कामगार
● गंगाखेड शुगर कामगार
●कापड दुकान कामगार
●औद्योगिक कामगार
चौकट
या केंद्रांने उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ दिलेल्या योजना -उपक्रम व कार्यक्रम…
● शिष्यवृत्ती योजना
●पाठ्यपुस्तक सहाय्यता योजना
●गंभीर आजार सहाय्यता योजना
●एमएससीआयटी अनुदान
●सभासद नोंदणी
●शिवणवर्ग प्रशिक्षण
●  शिशुमंदिर वर्ग
● ग्रंथालय नोंदणी
● शिवण अनुदान
● इंग्रजी संभाषण वर्ग
●  करिअर गाईडन्स
● वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम
●  मासिक कार्यक्रम
● गटस्तरीय कार्यक्रम
●रोजगार व स्वयंरोजगार कार्यक्रम
●  प्रशासकीय गतिमानता कार्यक्रम
●  गटस्तरीय कार्यक्रम संघ सहभाग
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।