भीषण दुष्काळामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर – पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

643
जाहिरात

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

मोर्शी तालुक्यात जनतेची पुन्हा एकदा परीक्षा पाहण्याचे निसर्गाने ठरविल्याचे दिसत आहे. मान्सून ने दगा दिला असून परतीच्या पावसाने डाव अर्ध्यावर सोडल्याने बळीराजासह तालुक्यातील सर्वसामान्य जनता, पुढील पावसाळ्यापर्यंत कसे दिवस काढायचे या काळजीत पडले आहे. हिवाळा अजून यायचा असताना उन्हाळा लागल्याचा अनुभव येत आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे चिन्ह दिसत आहे. मोर्शी तालुक्यात विविध सिंचन प्रकल्पांमध्ये व धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतीसाठी सुरळीत पाणी पुरवठा होणार का ? पिण्यासाठी तरी पाणी मुबलक उपलब्ध होणार का ? असे प्रश्न घोंघावू लागले आहेत. उपलब्ध पाण्यावर आगामी आठ-नऊ महिने काढताना सर्वांचीच कसोटी लागणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने मोर्शी तालुक्याला यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मोर्शी तालुक्यात पीक उत्पादन, भूजल पातळी, पाणीसाठे, नेमका किती पाऊस पडला याची प्रत्यक्ष पाहणी महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आली असून त्या माहितीच्या आधारे अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

राजकारण्यांच्या घोषणाप्रमाणेच पावसाचा अंदाजही दिशाभूल करणारा ठरला असून वरूनराजाने पुन्हा एकदा लपंडाव केल्याने मोर्शी तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. मान्सून, यंदा वेळेत आणि सरासरीत बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यापासून वर्तवण्यात आला. जून महिन्याच्या सुरवातीला काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मिळेल त्या मार्गाने पैश्याची व्यवस्था करत बळीराजाने छातीला माती लावून पेरणीचा सट्टा खेळला. जमिनीत ओल असल्याने रान बहरून आले. यंदा निसर्गाची कृपा होऊन भरभराट होण्याचं हिरवं स्वप्न शेतकरी राजा पाहू लागला. परंतु सालाबदाप्रमाणे यंदाही त्याचा भ्रमनिरास झाला .

गेल्या तीन चार वर्षापसून लहरी पावसाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त केले आहे. पेरणीच्या काळात पाऊस पडतो. मात्र ऐन दानाभरणीच्या वेळी निसर्गाची अवकृपा होते आणि उत्पदनाला फार मोठा फटका बसतो. मोर्शी तालुक्यात कपाशी तूर संत्रा पिकाची सरासरी सर्वाधिक आहे. जसजशी पिके जोम धरू लागतात तसतशी पिकांची तहान वाढत जाते. नेमकी याच वेळी पावसाने दडी मारली असल्याने पिकांना पुरेशे पाणी नसल्यामुळे पीकही हाती आले नाही . गत चार ते पाच वर्षांपासून पुरेसा पाऊस न पडल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यातच विहिरीला पाणी येईल किंवा धरणाचा आणि इतर जलस्त्रोतांचा पाणीसाठा वाढेल असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे कुत्रिम पाणीपुरवठ्यावर पीक जागविण्याचा पर्यायही आता उपलब्ध राहिलेला नाही. शेतातील पीक वाळून गेले तर शेतकरी कर्जबाजारी होणार आहे त्यामुळे, करायचे काय? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आणून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र कर्जमाफीतील अंलबजावणीचा घोळ अजून संपायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधकही कर्जमाफीच्या तरतुदीवरून राजकारण करताना दिसत आहे. अस्मानी संकटांचा मुकाबला करण्यासाठी राज्यकर्त्यांनी पंतप्रधान पीकविमा योजना आणली यातही अनेकांना पिकांचा विमा उतरवीला बहुतांश शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीक विम्याचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेचा भरवसा अधांतरीच म्हणावा लागेल. सरकारने कर्जमाफी केली असली तरी या योजनेतील घोळामुळे शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान केला जात आहे. पीककर्जासाठी आजही शेतकरी बँकेचे उंबरठा झिजवतोय. गेल्यावर्षी बोंड अळी नावाची अवदसा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली, आणि शेकडो हेक्टर मधील कपाशीत नांगर घालावा लागला. बोंड आळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर झाले. मात्र तिचेही वाटप अजून पूर्ण झालेले नाही.सरकारी योजना अंलबजावणीच्या अभावी केवळ भ्रमनिराश होत असून आस्मानानेही डोळे वटारल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून त्याला या संकटातून सावरण्यासाठी शासनाला समोर यावे लागणार आहे.

पूर्वी शेतीला सुगीचे दिवस होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीचा कणा ताठ होता. मात्र, जागतिकीकरणाच्या लाटेत धोरणात्मक सुधारणा अभावी ‘राजा’ संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱयाचाच ‘बळी’ गेला. लहरी निसर्ग, वाढता उत्पादनखर्च, शेतीमालाचे अत्यल्प भाव आणि तंत्रज्ञानचा अभाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जाऊ लागला. नापिकी, आवर्षण, पूर, गारपीट कोरडा दुष्काळ , अशा सातत्याच्या अस्मानी संकटामुळे त्याचे कंबरडे मोडल्या गेले. या दृष्टचक्रातून बाहेर निघण्यासाठी काहींनी आपल्या गळ्याला फास लावला तर काहींनी विषाचा घोट गळ्याखाली ढकलला. पण परिस्थिती बदलली नाही. यंदाही अस्मानी संकटाचे वादळ घोंगावू लागले आहे.. ‘दुष्काळ, नावाचा ‘काळ’ शेतकऱयांना गिळंकृत करण्यासाठी आ वासून उभा ठाकला आहे.. या बिकट क्षणी रुसलेला पाऊस यावा यासाठीची प्रार्थना शेतकऱयांसह सर्वजण सृष्टीच्या निर्माणकर्त्याकडे करत आहे. मात्र, पावसावर कोणाचेच नियंत्रण चालत नाही, त्यामुळे काळाची पाऊले ओळखून संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागणार आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज !

दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे झाले आहे . दुष्काळाच्या या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी राजकीय पक्षानिवेश सोडून या गंभीर प्रश्‍नावर सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पूरक पर्याय काढावा लागणार आहे. सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना स्थानिक नेते मंडळी गंभीर दुष्काळाबाबत पाण्याबाबत कोणीही ब्र काढण्यासही तयार नाही. निवडणुकीत होणार्‍या उधळपट्टीच्या निम्म्या खर्चात प्रत्येक गावात जल संधारनाची कामे मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळे प्रत्येक गाव पाणीदार होऊ शकते , असा विचार सध्या जनमनात चर्चीला जात आहे. अन्यथा सर्वांनाच राजकीय नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे, अशी लोक मानसिकता निर्माण होतांना दिसत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।