अमरावती, दि. 15 : विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्यात येत आहे. मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर निर्बंध घातले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजात प्रचार केल्याने ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांतता आणि स्वास्थ्यास बाधा पोहोचविण्याची आणि रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे या बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे.
निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापर करताना ध्वनीक्षेपकाच्या वापरासाठी पोलीस अधिकारी यांची परवानगी घ्यावी, सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० वाजेनंतर फिरते वाहन आणि क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, दिवसा प्रचाराकरीता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकांचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबून करावा, ध्वनीक्षेपकाचा आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध राहणार आहे. राजकीय पक्ष आणि उमदेवार, तसेच इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहणार आहे. ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध हे निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे.