अमरावती : विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर (सह प्रवासी) यांचे अपघात व त्या मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी (Addl DGP Traffic Maharashtra) राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्याबाबतचे पत्र नुकतेच सर्वांना पाठविण्यात आले आहे. आता सहप्रवाशांवर स्वतंत्र हेड खाली कारवाई होणार असून त्यासाठी ई चालान (e-Challan) मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे.
अपर पोलीस महासंचालक यांनी सर्वांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मागील ५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की विना हेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच सेक्शन १२८ आणि १२९ मोटार वाहन कायदा १९८८ कायद्यातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबंधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी. प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणार्या ई चालान मशीनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलीयन रायडर या दोन्ही केसेसची कारवाई या एकाच हेडखाली आल्याने विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती. विदर्भ24न्यूज
तरी ई चालान मशीनमध्ये सेक्शन १२९/१९४ (ड) एमव्ही ए शिर्षकामध्ये बदल करण्यात येत असून या पुढील कारवाई ही १) विना हेल्मेट रायडर २) विना हेल्मेट पिलीयन रायडर (सह प्रवासी) अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कडक व प्रभावीपणे करण्यात यावी. जेणेकरुन दुचाकीस्वार चालक व सह प्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींची संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असे या पत्रात म्हटले आहे.