अमरावती, दि. २० : परतवाडा वन परिक्षेत्रातील वाघाच्या शिकार प्रकरणी आदिवासी संशयितावर कोठडीत कोणतेही अत्याचार करण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता नेमराव कासदेकर यांना अटक करण्यापूर्वीच आजार असल्याचे, तसेच ते वन कोठडीत असताना त्यांच्यावर कोणतेही अत्याचार झाले नाहीत, याबाबत उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी वस्तुस्थितीदर्शक खुलासा केला आहे.
मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील पांढराखडक वर्तुळ, वस्तापूर बिटमध्ये दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी चौकशीत ९ संशयितांना अटक केली., अचलपूर न्यायालयाने संशयित आरोपींची चौकशीसाठी वनकोठडी दिली. संशयित आरोपींच्या वनकोठडी दरम्यान सर्व संशयित आरोपींची २४ तासाच्या अंतराने अचलपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
नियमित वैद्यकीय तपासणी दरम्यान नेमराव कासदेकर याच्या छातीवर कुठलीही जखम आढळून आली नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही वैद्यकीय अहवालामध्ये जबरदस्तीने जखम घडवून आल्याचा उल्लेख नाही. वनकोठडी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या नियमित वैद्यकीय तपासणीमध्ये नेमराव कासदेकर याच्या त्वचेला बुरशीजन्य संसर्ग असून गुप्तांगालाही संसर्ग असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. त्यानुसार उपचार करण्यात आले.
वनकोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत देताना दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृहात देण्यापूर्वी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातही वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीमध्येही छातीवर जखम असल्याचे नमूद नाही. नेमराव कासदेकर याच्या त्वचेवर संसर्ग असल्याचे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात नमूद आहे. संशयितास अमरावती तुरुंग अधिकारी यांच्या ताब्यात देत असताना संशयित आरोपीने शरीराला खाज येत असल्याचे, तसेच जागोजागी त्वचेचे सालपट निघत असल्याचे सांगितले. मध्यवर्ती तुरुगांतील कर्मचारी यांनीही संपूर्ण पाहणी करुनच संशयितास ताब्यात घेतले.
नेमराव कासदेकर याची न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती बिघडली आहे. याबाबत त्याच्या नातेवाईकांना तुरुंग प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मात्र दि. २० डिसेंबर २०२४ रोजी मारहाण करून छातीवर जखमा केल्याचे आणि गुप्तांगावर चटके दिल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे, मेळघाट प्रादेशिक वनविभाग उपवनसंरक्षक अग्रिम सैनी यांनी कळविले आहे.
00000