जीवनाला आकार देणारे अविभाज्य घटक म्हणजे गुरुजी
-ह.भ.प. साहिल राजेंद्र कासार महाराज (तळेगांव )
शेगांव:- वागणुकीने आणि मनाने जे चांगले असतात ते जगावर राज्य करतात. आपल्याला विचार, आचार, मन आणि बुद्धीने चांगले करण्याचे काम गुरुजी करतात. एकूणच जीवनाला आकार देणारे अविभाज्य घटक गुरुजी आहेत. असे देखणे विचार ह.भ.प. साहिल राजेंद्र कासार महाराज (तळेगांव) यांनी श्री. मस्कुजी बिरुजी बुरूंगले विद्यालय आणि श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरूंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात व्यक्त केले.
बुरूंगले एज्युकेशन सोसायटीने आजी विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मिळावे. त्यांच्यापासून जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळावी. या उदात्त उद्देशाने ‘स्नेहगंध’ माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या अप्रतिम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षीताई बुरूंगले यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून हर्षद मांडवगडे, अमरदीप वसंत देशमुख, भागवत खंडू कासार, रत्नाकर माणिकराव देशमुख, सुदामजी धोंडू गोरे विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवाजी निळे व डॉ. गोवर्धन गावंडे उपस्थित होते.
या मेळाव्यात समाजात प्रतिष्ठित पदावर विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या ६६ माजी विद्यार्थ्यांनी हिरिरीने, उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही कसे घडलो, संस्था, शाळा आणि शिक्षकांनी आम्हाला शिस्तीत ठेवून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे धडे देऊन जीवनात यशस्वी केले. तसेच उत्कृष्ट संस्कार करुन आम्हाला भरपूर प्रेम दिले. असे भावोद्गार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय मांडवे यांनी केले. सूत्रसंचालन संजय लाव्हरे सरांनी केले तर आभार पर्यवेक्षक शिवाजी निळे यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरुंगले यांच्या मार्गदर्शनात पार पडला.