चांदूर रेल्वे /
शिरजगाव (कसबा) जि.प. शाळेच्या एका शिक्षिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
बदलीचा लाभ मिळणेकरीता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र
चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील शाळेत असतांना घडली होती घटना
चांदूर रेल्वे पोलीसांकडून तपास सुरू
बदली प्रक्रिया सन २०२२ मध्ये संवर्ग – १ मधुन बदलीचा लाभ मिळणेकरीता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करुन प्रशासनाची दिशाभुल केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील जि.प. शाळेच्या तत्कालीन सहाय्यक शिक्षिका व सद्यास चांदूर बाजार तालुक्यातील जि.प. शाळा शिरजगाव (कसबा) येथे कार्यरत असणाऱ्या ज्योती कृष्णराव बरडे यांच्याविरूध्द चांदूर रेल्वे पोलीसांत गुरूवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ज्योती कृष्णराव बरडे ह्या चांदूर रेल्वे तालुक्यातील जि.प. पुर्व माध्यमिक शाळा, निमगव्हाण येथे सन २०२२ मध्ये कार्यरत होत्या. अशातच २०२२ च्या बदली प्रक्रियामध्ये संवर्ग-१ मधुन बदलीचा लाभ मिळणेकरीता अपंगत्वाचे बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभुल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्रशासनाची दिशाभुल केल्याचे विभागीय खाते चौकशीमध्ये सिद्ध झाले असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, अमरावती) यांचे निर्देशानुसार स्थानिक पं.स. चे विस्तार अधिकारी (शिक्षण) विनय देशमुख यांनी याबाबतची फिर्याद चांदूर रेल्वे पोलीसांत दिली. यावरून चांदूर रेल्वे पोलीसांनी सद्यास जि.प. शाळा शिरजगाव कसबा (पं.स. चांदूर बाजार) येथील सहाय्यक शिक्षिका ज्योती कृष्णराव बरडे यांच्याविरूध्द भादंवी कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.