राशन धान्य लाभार्थ्यांना निकृष्ट ज्वारीचे वाटप
निरीक्षकांना पाहणी दरम्यान खराब धान्य दिसत कसे नाही?
शेगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट ज्वारीचे वाटप होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
केंद्र सरकारमार्फत, विविध पात्र राशन कार्ड धारकांना नियमाप्रमाणे धान्य वाटप केले जाते. यामध्ये सध्या घडीला शासनामार्फत प्रती व्यक्ती पाच किलो धान्य वाटप करण्यात येते. सदर धान्य स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याचे वाटप करण्यात येते या सर्व प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांना मिळालेल्या ज्वारी धान्याचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाभार्थी नागरिकांना मध्ये संताप पाहायला मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शेगाव व खामगाव तालुक्यामध्ये सुमारे दोन हजार क्विंटल ज्वारीचा साठा आहे. सदर साठ्यातूनच लाभार्थ्यांना ज्वारीचे वाटप होत असल्याचे निदर्शनास आले असून हा ज्वारीचा साठा अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तो तात्काळ थांबून त्या ठिकाणी दर्जेदार धान्याचे वाटप व्हावे अशी मागणी नागरिकांमधून समोर येत आहे.
निरीक्षकांची नेहमीच स्वस्त धान्य दुकानांमध्ये निरीक्षण पाहणी होत असतात त्या पाहणी दरम्यान निरीक्षकांना या निष्कृष्ट दर्जाची ज्वारी धान्य दिसत कसे नाही? असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.