शहर वाहतुकीत दि. 14 एप्रिल रोजी तात्पुरता बदल ; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन

*सुधारित वृत्त

अमरावती, दि.08 – : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दि. 14 एप्रिल रोजी असल्याने यादिवशी मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिली आहे.

तात्पुरत्या अधिसूचनेनुसार यादिवशी इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. ही अधिसूचना दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे मार्ग बंद असतील

इर्विन चौक ते खापर्डे बगीचा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. गर्ल्स हायस्कुल चौक ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. मर्च्युरी टी पॉईंटकडून इर्विन चौकाकडे येणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. इर्विन चौक ते मालविय चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तसेच मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक तसेच ट्रॅफिक ऑफिस, इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

हे असतील पर्यायी मार्ग

इर्विन चौक ते खापर्डे बगिचा या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी एस. टी. बसस्थानक मार्गाचा अवलंब करावा. गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गाने वाहतूक करणारी वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर ते विलास नगर रोड या मार्गाचा अवलंब करतील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी लेखूमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप या मार्गाचा अवलंब करावा.

रेल्वे स्टेशन चौक ते मर्च्युरी टी पॉईंट या मार्गाने वाहतूक करणारी वाहने रेल्वेस्थानक ते एस. टी. स्थानक व जयस्तंभ चौक, दीपक चौक, चौधरी चौक या मार्गांचा अवलंब करतील. मालविय चौक ते इर्विन चौकाकडे येणाऱ्या वाहनानी मालविय चौक, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाचा अवलंब करतील.

वरील वाहतूक नियम रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही.