अमरावती दि. ३०: केंद्र शासनामार्फत पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज योजना’ येत्या सहा महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांनी सर्व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता दहा मेगा वॅट पर्यंत नेणे अपेक्षित आहे .विजेत्या गावांना एक कोटी रुपयांचे केंद्रीय वित्तीय सहाय्य मिळेल. यासाठी स्पर्धेत विजयी होण्यासाठी प्रत्येक गावाने चांगले काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज येथे केले.
पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज योजनेचा आज जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते नियोजन भवन येथे शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख तसेच प्रकल्प अधिकारी , सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित होते .
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, पारंपारिक ऊर्जा स्त्रोतावरचे अवलंबित्व कमी करून अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर भर देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. या दृष्टीने स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावांमध्ये स्पर्धेच्या कालावधी दरम्यान जास्तीत -जास्त विविध अपारंपारिक ऊर्जा साधने, सौर उपकरणे आस्थापित करणे गरजेचे आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच तसेच गावकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा. सर्व उपकरणांमध्ये पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत -जास्त घरांवर सोलर रूफ टॉप प्रकल्पाची उभारणी करावी. तसेच पीएम कुसुम योजनेअंतर्गत जास्तीत -जास्त सौर पंप अथवा इतर विकेंद्रित अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणे आवश्यक आहे. या सर्व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता दहा मेगावॅट पर्यंत असणे आवश्यक आहे .यासाठी सीएसआर निधी, विभागाचा निधी किंवा जिल्हास्तरीय निधी व अन्य उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करता येईल. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्यांचेही सहकार्य घ्यावे. हा शासकीय उपक्रम पूर्ण होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून सहा महिने विशेष प्रयत्न करून स्पर्धक गावांनी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सौर कृषी पंप योजना अत्यंत महत्त्वाची आहे. दिवसा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी द्यावे लागते. परंतु सौर कृषी पंप योजना यासाठी शेतकऱ्यांना मदतनीस ठरत आहे .याच प्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देखील शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे. याबाबत जनजागृती निर्माण करावी. स्पर्धेतून मिळालेल्या निधीमध्ये गावाचा विकास होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज योजनेंतर्गत अमरावती तालुक्यातील वलगाव, भातकुली तालुक्यातील पुर्णा नगर, धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर, तिवसा तालुक्यातील वऱ्हा, मोर्शी तालुक्यातील हिवरखेड, चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडगी, अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुस तळणी, दर्यापुर तालुक्यातील वडनेर गंगाई तसेच वरुड तालुक्यातील जरुड या स्पर्धक गावांची निवड झाली आहे,अशी माहिती विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली आहे.
******