अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात एकूण 169 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 125 प्रकरणे वाळूशी संबंधित आहेत. या कारवाईमध्ये, जिल्हा प्रशासनाने एकूण एक कोटी 43 लक्ष दंड वसूल केला आहे.
अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत. ही पथके गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करत आहेत. रॉयल्टी पासेस किंवा दुय्यम वाहतूक पासेस नसलेल्या वाहनांवर शासन नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.
या कारवाईव्यतिरिक्त, प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांमधून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिली जात आहे. ही प्रक्रिया संबंधित तहसीलदारांमार्फत सुरू आहे.
नागरिकांना परिसरात कुठेही अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे आढळल्यास, त्यांनी संबंधित तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय कारवाईचा तपशील (1 एप्रिल, 2025 ते 7 ऑगस्ट, 2025):
* अमरावती: 19 प्रकरणे, 11 वाहने जप्त, रु. 13.90 लाख दंड वसूल.
* तिवसा: 16 प्रकरणे, 16 वाहने जप्त, रु. 17.42 लाख दंड वसूल.
* भातकुली: 11 प्रकरणे, 8 वाहने जप्त, रु. 6.87 लाख दंड वसूल.
* चांदूर रेल्वे: 5 प्रकरणे, 5 वाहने जप्त, रु. 4.11 लाख दंड वसूल.
* धामणगाव रेल्वे: 19 प्रकरणे, 15 वाहने जप्त, रु. 14.95 लाख दंड वसूल.
* नांदगाव खंडेश्वर: 2 प्रकरणे, 1 वाहन जप्त, रु. 1.26 लाख दंड वसूल.
* मोर्शी: 21 प्रकरणे, 6 वाहने जप्त, रु. 28.01 लाख दंड वसूल.
* वरुड: 12 प्रकरणे, 6 वाहने जप्त, रु. 16.55 लाख दंड वसूल.
* दर्यापूर: 8 प्रकरणे, 7 वाहने जप्त, रु. 4.92 लाख दंड वसूल.
* अंजनगाव सुर्जी: 10 प्रकरणे, 8 वाहने जप्त, रु. 7.12 लाख दंड वसूल.
* अचलपूर: 29 प्रकरणे, 28 वाहने जप्त, रु. 16.33 लाख दंड वसूल.
* चांदूर बाजार: 8 प्रकरणे, 1 वाहन जप्त, रु. 5.96 लाख दंड वसूल.
* धारणी: 8 प्रकरणे, 6 वाहने जप्त, रु. 6.03 लाख दंड वसूल.
* चिखलदरा: 1 प्रकरण, 1 वाहन जप्त, रु. 0 दंड वसूल.
* एकूण: 169 प्रकरणे, 119 वाहने जप्त, रु. 143.43 लाख दंड वसूल.