*वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत*

 

अमरावती, दि.10 : अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे बडनेरा रेल्वे स्टेशनवर उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केले.

 

नागपूर येथून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बडनेरा रेल्वे स्टेशनवर विदर्भासाठी असलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले. हारफुलांनी सजलेल्या रेल्वेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित मान्यवरांनी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. बोंडे म्हणाले, विदर्भात वंदे एक्सप्रेसचे स्वागत होत आहे. पुणे येथे जाणाऱ्या चाकरमाण्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सुरक्षित आणि सुसज्ज असा प्रवास होणार आहे. या एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मिळाला आहे, ही आनंदाची बाब आहे. येत्या काळातही सोयीचा आणि गतिमान प्रवास होणार यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
खासदार श्री. वानखेडे म्हणाले, वंदे भारतची दुपारची वेळ प्रवाशांच्या सोयीची नाही. सायंकाळची वेळ असल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होईल. त्यामुळे येत्या काळात रेल्वेचा वेळ बदलण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.