अमरावतीत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थरारक सापळा कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक आणि चालकाला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दारुचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि जप्त केलेले वाहन सोडवून देण्यासाठी ही रक्कम मागितल्याचा आरोप असून, ही कारवाई संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती परिक्षेत्राने गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट २०२५) दुपारी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक आणि चालक यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१. सुरज रतनसिंग दाबेराव (वय ५०), पद – निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, अमरावती. राहणार – कॉंग्रेस नगर, सिग्नेचर सोसायटी, फ्लॅट क्र. ६१०, सी विंग, अमरावती.
२. संजय झिमाजी देहाडे (वय ५७), पद – चालक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, अमरावती. राहणार – एम. आर. कॉलनी, फ्लॅट क्र. २, भांदकर रेसिडेन्सी, अमरावती.
तक्रारदार हे अमरावतीत किराणा दुकान चालवतात तसेच दारुविक्रीचा व्यवसायही करतात. दिनांक १६ जुलै २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, अमरावती विभागाने तक्रारदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे MH 29 AR 1036 क्रमांकाचे होंडा अॅमेझ हे चारचाकी वाहन जप्त केले होते. त्यानंतर वाहन सोडून देण्यासाठी आणि दारुचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपी निरीक्षक दाबेराव यांनी तक्रारदाराकडे दरमहा १५,००० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केली.






