*नवीन पूल बांधण्याच्या शक्यता पडताळणार*
*पूल बांधणी संदर्भात रेल्वेशीही चर्चा सुरू*
अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती बडनेरा रेल्वे मार्गावरील वाहतुकीसाठी असलेला पूल क्षतीग्रस्त झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहण्यास जात आहे. लवकरच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघा वासनकर आदी उपस्थित होते.
आमदार संजय खोडके यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत गुगल मॅपद्वारे सूचना करण्यात येत आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. तसेच गर्दी टाळण्याकरिता नेहरू मैदान येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. नेहरू मैदान या पर्यायी रस्त्यामुळे बरीचशी वाहतूक नियंत्रित करण्यास मदत होईल, असे सांगितले.
आमदार सुलभा खोडके यांनी रेल्वेने सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक होते. सण उत्सवाच्या काळात अचानक रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यासह मुख्य बाजारपेठेतील चौकात असलेल्या पारधी समाजामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याने याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
रेल्वे मार्गावरील उडाणपूल क्षतीग्रस्त झाल्यामुळे वाहतूक नियंत्रणाची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक शाखा कार्य करीत आहे. उडाणपुलाच्या कामाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार उडाणपूल बांधावयाचे झाल्यास यासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करावे लागेल. तसेच पर्यायी रस्त्याची जागा कुणाला दिली असल्यास याचीही पाहणी करावी लागणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने खातरजमा करावी. पर्यायी रस्त्याची जागा डीपी रस्त्यावर असल्याबाबत बघण्याचे महापालिकेला सूचना केल्या. सध्या शहरात गणेशोत्सव असल्यामुळे वाहतुकीची सद्यःस्थिती जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली.






