महाराष्ट्रातील नागरिकांना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने एक खुशखबर दिली आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने २४ तास खुली ठेवता येणार आहेत. परंतु मद्यपानगृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर आणि देशी बार यांच्यावरील निर्बंध मात्र कायम असणार आहे. ही आस्थापने वगळून इतर सर्व आस्थापने आणि दुकाने दिवस-रात्र सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागातर्फे हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवरील वेळेचे निर्बंध कायम ठेवताना इतर आस्थापने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून हॉटेल्स, आस्थापने आणि दुकाने यांना काही वेळा होत असलेल्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
राज्यात 24 तास काय सुरू?
- सर्व दुकाने
- निवासी हॉटेले
- उपाहारगृहे
- खाद्यगृहे
- थिएटर
- सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा
- इतर आस्थापना
काय बंद राहणार?
- मद्यपान गृहे
- बार परमिट रूम
- हुक्का पार्लर
- देशी बार






