तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार करुन हत्या

13486
जाहिरात

 

हजारोंच्या जनसमुदायाने दिला साश्रूनयनांनी निरोप

बाजारपेठ कडकडीत बंद रस्त्यांवर शुकशुकाट

अकोटः ता. प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर काल (दि.२१) रात्री दहा वाजता दरम्यान शहर पोलीस  वसाहतीत गोळीबार झाला. या हल्ल्यात अज्ञात दोन आरोपींनी देशी कट्ट्याचे २ राऊंड पुंडकर यांच्यावर फायर केले या फायर मधील दोन गोळ्या त्यांना लागल्याने ते जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत अकोला येथे उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.शनिवारी हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

शुक्रवारी रात्री तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार झाला. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय व तेथून आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे हलवण्यात आले होते. मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान आज शनिवारी दु.1 वाजता त्यांचे पार्थिव अकोट येथे अंत्यविधीसाठी आणण्यात आले.

यावेळी अकोला पासूनच पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. बच्चू कडू ॲम्बुलन्स सोबत होते. दु.२.३० वा. दरम्यान दर्यापूर रोड उज्वल नगरातील त्यांच्या घरून अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी होता. रामेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच चौका चौकात पोलिसांचे फिक्‍स पॉइंट लावण्यात आले होते. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार पुंडकर हे शुक्रवार रात्री कबूतरी मैदानाजवळील दूध डेअरी जवळ बोलत जात असताना दुचाकीवर दोघांनी त्यांचा पाठलाग केला.

त्यांना पाठलाग करणाऱ्यांचा संशय आला. पोलीस वसाहतीतून ठाण्याकडे धाव घेण्याच्या प्रयत्नातच त्यांच्यावर हल्लेखोरांनी देशी कट्ट्यातून गोळीबार केला. हल्लेखोरांच्या पहिल्या राऊंड मधील गोळीबाराने जखमी अवस्थेत ते खाली कोसळले. अशातच हल्लेखोरांनी दुसरा राउंड त्यांच्यावर फायर केल्याने ते जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले.यावेळी पोलिस वसाहतीतील कर्मचारी यांनी बाहेर येऊन बघितले असता. तुषार पुंडकर जखमी होऊन त्यांना पडलेले दिसले. तर आरडाओरड केल्याने दोघे अज्ञात हल्लेखोर फरार झाले.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध कलम 302, 34 व 3, 25 आर्म अॕक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुपारी देऊन हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष- जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की तुषार पुंडकर यांची हत्या ही सुपारी देऊन केल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून हत्येच्या तपासासह आरोपींना पकडण्यासाठी विविध सहा पथकं गठित करण्यात आली आहेत. तसेच अजून कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही तर लवकरच आम्ही आरोपींना पकडून हत्येमागील कारणांची माहिती देऊ.तोवर नागरिकांनी तपास यंत्रणेवरील आपला विश्वास कायम राखत शांतता ठेवून सहकार्य करावे असे आवाहन केले.

पुंडकर यांच्या हत्येने शहर हादरले…

तुषार पुंडकर यांच्या हत्येने शहरात प्रचंड खळबळ उडाली असून  झालेल्या गोळीबाराने शहर हादरले आहे. यावेळी घटनास्थळ बघण्यासाठी नागरिकांनी पोलिस वसाहतीत प्रचंड गर्दी केली होती. तर हल्लेखोरांबाबत शहरात विविध चर्चांना ऊत आला होता.

शहरात तणावपूर्ण शांतता,परिस्थिती नियंत्रणात

तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वार्ता शहरात पोहोचतात सकाळपासून बाजारपेठ बंद होती. तर दुपारी बारा वाजता दरम्यान तरुणांच्या जमावाने पुन्हा रस्त्यावर उतरून बाजारपेठ बंदचे आवाहन केल्याने दुपारनंतर शहर कडकडीत बंद होते तर रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.मात्र चौकाचौकात पोलिस बंदोबस्त असल्याने परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात होती.तर शहरात उलटसुलट चर्चांना ऊधान आले होते


जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।