मातृप्रेम दर्शवणारे ‘भिकारी’चे गाणे प्रदर्शित

0
832
‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या आगामी सिनेमातील शीर्षकामध्ये, मराठीच्या एका प्रचलित म्हणीचा वापर करण्यात आला आहे.  ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी हि प्रचलित म्हण असून, याचा अर्थदेखील तितकाच गहिरा आहे. ‘आई’ चे हेच महत्व पटवून देणारे भिकारी चित्रपटातील ‘मागू कसा’ हे बोल असलेले गाणे, काळजाचा वेध घेते. मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित ‘भिकारी’ या बहुचर्चित सिनेमातील ह्या गाण्याचे नुकतेच अंधेरी इथे सॉंग लॉंच करण्यात आले. विशेष म्हणजे, या सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या आईंनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. गणेश आचार्य दिग्दर्शित ‘भिकारी’ ह्या सिनेमात आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची नाजूक गुंफण आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘मागू कसा’ हे गाणे याच धाग्यातले असून, हे गाणे प्रत्येकांना आपल्या आईची आठवण करून देईल.
संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडीमध्ये गणल्या जाणा-या अजय-अतुलमधील अजय गोगावलेचा या गाण्याला आवाज लाभला आहे. प्रसिद्ध गीतलेखक गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे.
आईसाठी देवाला आर्त हाक मारणाऱ्या मुलाचे हे गाणे असून, स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात स्वप्नीलचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आईसाठी सर्व काही सोडून, रस्त्यावर आलेल्या मातृभक्त मुलाचे हे गाणे पाहणा-यांच्या डोळ्यात अश्रू आणतील इतके भावनिक आणि हृदयस्पर्शी झाले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. यात स्वप्नील जोशी ची मध्यवर्ती भूमिका असून, रुचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर,  सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांची देखील विशेष भूमिका असणार आहे.