राज्याचा पशुसंवर्धन विभाग देशात अव्वल क्रमांक मिळविणार – पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

0
712
Google search engine
Google search engine

• राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पशु विज्ञान केंद्र
• प्रत्येक गावामध्ये पशुसखी नियुक्ती, दे.राजा दवाखान्याला 10 लाख रूपये
• मागेल त्याला मत्स्यबीज व मत्स्यखाद्य देणार
• जिल्ह्यातील 7 पशुवैद्यकीय दवाखान्यांना आएसओ मानांकन प्राप्त

बुलडाणा- पशुसंवर्धन हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटूंबांसाठी योजना राबवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यात येत आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी पेक्षा पशुसंवर्धन क्षेत्राचा वाटा जास्त आहे. देशात नवव्या क्रमांकावर असलेल्या पशुसंवर्धन विभाग आता कार्यपद्धती, योजनांचे क्रियान्वयन याबाबतीत तीसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाचे काम अशाच पद्धतीने सुरू राहील्यास निश्चितच हा विभाग देशात अन्य राज्यांच्या पशुसंवर्धन विभागाच्या तुलनेत अव्वल क्रमांक मिळविणार आहे, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील सात पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, उपाध्यक्षा श्रीमती मंगलाताई रायपूरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिनकर देशमुख, समाज कल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, पशुसंवर्धन विभागाच्या अमरावती विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रकाश चव्हाण, उपायुक्त डॉ. विलास जायभाये, दत्ता खरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील पसरटे, आएसओ संस्थेचे प्रशांत जोशी आदी उपस्थित होते.
आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी संस्थेला कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात येत नसल्याचे सांगत पशुसंवर्धन मंत्री म्हणाले, आयएसओ मानांकन हे लोकसहभागातून प्राप्त झाले पाहिजे. या मानांकनानंतर संस्थेकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. कामाचे मुल्यांकन होते. पशुसंवर्धन म्हणजे शेतकरी कुटूंबाला मिळणारे एएटीएम आहे. प्रत्येक कुटूंबाने शेळी, म्हैस, गाय व कोंबड्या पाळल्यात, उत्पन्न हमखास मिळते. त्यामुळे शेतीवरचा भार कमी होवून कुटूंबाला आर्थिक मदत प्राप्त होते. या विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच एमपीएससीच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय या विभागांतही रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहे. 
ते पुढे म्हणाले, दुधाचे दर 7 रूपयांनी वाढविले आहे. याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत आहे. कृषि विज्ञान केंद्राप्रमाणे आता प्रत्येक जिल्ह्यात पशु विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुसंवर्धन व त्याच्या संबंधीत क्षेत्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या केंद्रामुळे शेतकरी प्रशिक्षण वर्गही मोठ्या प्रमाणावर चालतील. त्याचप्रमाणे राज्यात 27 हजार 752 ग्रामपंचायतीमध्ये पशु सखींची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही सखी गावातील महिलांना, शेतकऱ्यांना, शेतमजूरांना पशुसंवर्धन विभागाच्या येाजना, जनावरांचे लसीकरण, रोग प्रतिबंधक उपाय, बाजारपेठ याविषयी प्रशिक्षीत करेल. तसेच गाय, म्हैस यांच्या गर्भारपणामध्ये वेताच्यावेळी काळजी घेण्यासाठी एसएमएस सुविधा देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या नजीकच्या डॉक्टरला एसएमएस केल्यास लगेच वैद्यकीय सुविधा मिळेल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी) च्या माध्यमातून जिल्ह्यात दुग्धविकास होणार आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. 
मुंबईत उद्योगपतींच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री म्हणाले, रतन टाटा यांनी मुंबईत जनावरांच्या दवाखान्याकरीता 200 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. या रूग्णालयाच्या जागेचे हस्तांतरणही करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसात या भव्य रूग्णालयाचे काम सुरू होणार आहे. आयएसओ मानांकन मिळविलेल्या दे.राजा श्रेणी 1 दवाखान्यात उपचार सुविधा, अद्ययावत यंत्रसामुग्रीकरीता 10 लक्ष रूपये देण्यात येत आहे. याबाबत लवकरच प्रशासकीय कारवाई पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मागेल त्याला शेततळे योजनेच्या धर्तीवर मत्स्यव्यवसाय विभागामध्ये मागेल त्याला मत्स्यबीज व मत्स्यखाद्य देण्याची योजना सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मत्स्यउत्पादन वाढून मत्स्यकास्तकारांना आर्थिक लाभ मिळेल. निलक्रांती योजनेच्या माध्यमातून राज्यात 100 हॅचरींची निर्मिती करण्यात येत आहे. या हॅचरीमुळे राज्य मत्स्यउत्पादनात निश्चितच अव्वल ठरणार आहे. 
याप्रसंगी जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांनी आयएसओ नामांकन मिळविलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन म्हणाले, जिल्ह्यातील 122 पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी 7 दवाखाने आयएसओ मानांकन प्राप्त आहेत. तसेच 35 दवाखाने प्रक्रियेत आहे. निश्चितच संपूर्ण दवाखाने आयएसओ मानांकित करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. सभापती दिनकर देशमुख म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
कार्यक्रमादरम्यान प्रशांत जोशी यांनी आयएसओ करण्याची प्रक्रिया विषद केली व सातही पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या व्हिडीओ क्लिपचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. जैस्वाल यांनी, तर आभार डॉ. चरखे यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर यांना पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्यावतीने लोणार सरोवर व संत गजानन महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.