सांगली महापालिका क्षेत्रात चिनी वस्तूंवर तात्काळ बंदी घाला ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी

0
556
Google search engine
Google search engine

सांगली–

हिंदुस्थानच्या सीमेवर सध्या अत्यंत तणावपूर्ण स्थिती आहे. चीनने हिंदू भाविकांना मानस सरोवर येथे जाण्यास प्रतिबंध केला आहे. त्याही पुढे जाऊन चीनने त्यांचे सैन्य आणि युद्धनौकाही तैनात केली आहे. चीनच्या मुजोरीला तोंड देण्यासाठी आपले सैन्यदल सक्षम आहे. त्यामुळे चीनचा जाहीर निषेध करण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात चिनी वस्तूंवर तत्काळ बंदी घालावी, तसेच मद्याची दुकाने वाचवण्यासाठी रस्ते हस्तांतर करू नयेत, असे निवेदन श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, जिल्हाधिकारी यांना भव्य दुचाकी फेरी काढून देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राजवाडा चौक येथील चिनी आस्थापन व्हीवोचा फलक उतरवून राष्ट्रप्रेमाची झलकच नागरिकांना दाखवली. महापालिका आयुक्तांशी बोलतांना श्री. अविनाश सावंत म्हणाले, सध्या महापालिका क्षेत्रात रस्त्यारस्त्यावर सायंकाळी चिनी (चायनीज) खाद्यपदार्थांचे व्यवसाय जोरात चालू आहेत, यावर तात्काळ बंदी यावी. याचप्रकारे महापालिका क्षेत्रात भ्रमणभाष, तसेच अन्य चिनी वस्तूंचे विज्ञापन असलेले होर्डींग यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. मद्यबंदी ही महापालिका क्षेत्रात नव्हे, तर देशव्यापी असायला हवी. यावर महापालिका आयुक्त श्री. रवींद्र खेबुडकर यांनी याची तत्परतने दखल घेऊ, असे आश्वासन दिले. या वेळी महापौरांनी महापालिका चिनी वस्तूंवर बहिष्काराचा तसेच शिरस्त्राण सक्तीच्या विरोधातही ठराव करेल, असे आश्वासन पू. भिडेगुरुजी यांना दिले.