प्रहार संघटनेच्या प्रेतयात्रा आंदोलनाची जिल्हा परिषदकडून दखल – दुस-याच दिवशी कंत्राटदारासह कामगार वणीत दाखल

0
978
Google search engine
Google search engine

Amravati News/-

चांदुरबाजार तालुक्यातील वणी येथील स्मशानभूमीचे अर्धवट स्थितीत पडून असलेले काम त्वरीत सुरु करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने काल जिल्हापरिषदेत प्रतिकात्मक प्रेतयात्रा नेवून सीईओंना तात्काळ काम सुरु करण्याची मागणी केल्यानंतर या आंदोलनानंतर आज दुस-या दिवशी प्रशासनाने कामाला सुरुवात केली. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने गावात कुणाचे मरण झाल्यास नागरिकांना प्रेतयात्रा घेवून या रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले होते. चिखल तुडवत जावे लागत होते. रस्त्याबाबत प्रहारने वारंवार मागणी करुनही काम सुरु करण्यात आले नव्हते. वणी ते विश्रोळी रस्त्याचे मंजुर असलेले काम बंद करण्यात आले होते. सदर काम तातडीने सुरु करण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख मंगेश देशमुख यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. परंतु प्रशासनाकडून याची गांर्भीयाने दखल घेण्यात आली नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याच सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्याने सदर रस्त्याचे काम बंद पाडले होते. त्यामुळे प्रहार संघटनेच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता प्रतिकात्मक प्रेतयात्रा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांच्या दालनापर्यंत नेली. प्रशासनाने यावर तोडगा म्हणून कालच उद्यापासून कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन प्रहार जनशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे कंत्राटदार व काही मजुर प्रत्यक्षात वणी गावात पोहचले. त्यांनी रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या दिवसातही स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार असल्याने वणीवासियांनी प्रहारच्या पदाधिका-यांचे आभार मानले. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मंगेश देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.