मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांचे निकाल ३१ जुलै पर्यंत जाहिर करणार –श्री विनोद तावडे

0
690

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –

 

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एकूण ४७७ परीक्षांच्या निकालापैकी १०४ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहिर केले असून उर्वरित निकाल ३१ जुलै च्या मुदतीत लागतील. तसेच मुंबई विद्यापीठाच्या एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, आणि  विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना कोणत्याही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये समझोता केला जाणार नाही असे ठाम आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषेदत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या निकालासंदर्भात विधानपरिषदेत शरद रणपिसे, संजय दत्त आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तावडे यांनी सांगितले की,  आता पर्यंत ४७७ पैकी १०४ परिक्षांचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. कला विभागाचे ६१९९२, वाणिज्य विभागाचे ३७५६०६, विधी विभागाचे ३९९४२, व्यवस्थापन विभागाचे २८४७७, विज्ञान विभागाचे १३००४, तंत्रज्ञान विभागाचे १०४७४ असे एकूण ५ लाख २९ हजार २९५ अशा उत्तर पत्रिका तपासण्याच्या शिल्लक आहेत. आतापर्यंत उत्तर पत्रिकातपासणीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. विधी आणि व्यवस्थापना विभागाच्या परिक्षा तपासणीमध्ये उत्तरपत्रिका तपासणारे वकील हे सकाळी न्यायालयात वकीली केल्यानंतर उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना सध्या तपासणीसाठी कमी अवधी उपलब्ध होत आहे.  परंतू, पेपर तपासणीसांची संख्या वाढविण्यात येणार आहे. नागपूर व मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी मदत घेण्यात येत आहे अशी माहिती तावडे यांनी दिली. ऑनलाईन उत्तर पत्रिका तपासणीचे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. परंतू, आमच्या दृष्टीने सध्या विद्यार्थ्यांचे निकाल वेळत जाहिर होणे हे प्राधान्य आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर संबंधित कंपनीची नक्कीच चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यापीठातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही युध्दपातळीवर प्रयत्न करु. या प्रक्रियेमध्ये अधिक मनुष्यबळ देण्यात येईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले. उत्तर पत्रिका फेरतपासणीसाठी सध्या विद्यापीठ ६०० रुपये इतके फेरतपासणी आकारत आहे. हे शुल्क रद्द करण्याबाबत युवा सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी मागणी केलेली आहे. फेरतपासणी पूर्ण मुल्य रद्द करायचे की काही प्रमाणात ते कमी करायचे याबाबत सरकार नक्कीच विचार करेल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.