विसर्जन स्थळी महापालिकेने मूर्तीदान मोहीम राबवू नये ! – हिंदु धर्म संघटनेचे महापालिकेकडे निवेदन

0
649
Google search engine
Google search engine

कोल्हापूर – गणेशोत्सवाच्या कालावधीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तथाकथित पर्यावरणवादी यांनी काही वर्षे मूर्तीदान मोहीम राबवली; पण भाविकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. बहुसंख्य गणेशभक्त वाहत्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करतात. अशा वेळी महापालिका नदीत जाण्याचे मार्ग बंद करते. त्यामुळे विसर्जनासाठी जाणार्‍या भाविकांना विसर्जन करतांना अडचणींना तोंड द्यावे लागते. महाराष्ट्र शासनाने जलप्रदूषण रोखण्याविषयी पाठवलेल्या परिपत्रकात ‘स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महापालिका प्रशासन यांनी गणेशमूर्ती दान घेऊन विसर्जित कराव्यात’, असा उल्लेख नाही. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या वेळी विसर्जनस्थळी महापालिकेने मूर्तीदान मोहीम राबवू नये, अशा मागणीचे निवेदन हिंदु धर्म संघटनेच्या वतीने महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. आरोग्य अधिकारी यांनी ‘तुमच्या मागण्या आयुक्तांपर्यंत पोहोचवतो’, असे आश्‍वासन दिले.

या वेळी कुंभार समाजाचे श्री. बाळासाहेब निगेवकर, हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, हिंदु महासभा शहरप्रमुख श्री. मनोहर सोरप, कोल्हापूर जिल्हा संघटक सौ. रश्मी आठसूळ, महिला उपाध्यक्ष श्रीमती सुवर्णा पोवार, शिवसेनेचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, उपाध्यक्ष श्री. आकाश नवरुखे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री शिवाजीराव ससे, गोविंदराव देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे…

१. कोल्हापूर जिल्ह्यात नाल्यांद्वारे नदीपात्रात प्लास्टिक पिशव्या, सांडपाणी, घनकचरा, तसेच अन्य घटकही सोडले जाता. अशा जलप्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

२. शहरातील जनावरे, बकरी, पशू यांच्या मासांची विल्हेवाट न लावता ते नदीपात्रात टाकले जाते. तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील तीनही जलशुद्धीकरण यंत्रे बंद असल्याने प्रतिदिन २५ टँकर मैला थेट पंचगंगेत सोडण्यात येतो.

३. नदीकाठी कपडे किंवा गुरे धुणे यांना प्रतिबंध, तसेच नदीकाठीवरील वीटभट्टी बंद करणे, मातीचा उपसा बंद करणे असे महापालिकेने केलेले नाही.

४. छत्रपती शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीच्या शेजारच्या नाल्यात कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी प्रक्रियेविना पंचगंगेत सोडले जाते.

५. दुधाळी नाला परिसरात म्हशीपालन, सोने-चांदीचे दागिने व्यवसाय, पॉलिशिंग व्यवसाय असल्याने नाल्यात आम्लपदार्थ, विषारी द्रव्ये, प्राण्यांचे मलमूत्र कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते.

६. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाजवळील नाल्यात रुग्णालयातील जैव कचरा, तसेच अन्य कचरा टाकला जातो. यातील सांडपाणी पुढे जयंती नाल्याद्वारे थेट पंचगंगेत सोडले जाते.