महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणुकीसाठी तायपेई सकारात्मक :- पर्यटन राज्यमंत्री येरावार

0
573
नवी दिल्ली:- 
महाराष्ट्रा तील स्मार्ट शहर प्रकल्प, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग, समुद्री पर्यटन, कौशल्य विकास क्षेत्रांत गुतंवणुकीसाठी  तायवानची राजधानी असलेल्या तायपेई सरकारने सकारात्मकता दर्शविली आहे अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज दिली.  
                    महाराष्ट्र -तायपेयी निती गटाची पहिली बैठक
तायपेई येथील सरकारी शिष्ठमंडळाने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात विविध क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा प्रकट केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र तायपेई नितीविषयक पुढाकारासाठी एक कार्यगट स्थापन केला. या कार्यगटाची आज दिल्लीतील तायपेई शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रात पहिली बैठक आयोजित करण्यात आली.  दिल्लीतील तायपेई शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्राचे प्रमुख श्री. टियन यांच्या अध्यक्षतेतील तायपेई सरकारच्या शिष्ठमंडळाचे सदस्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
  या बैठकीत स्मार्ट शहर प्रकल्प, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग प्रकल्प, समुद्री पर्यटन, कौशल्य विकास कार्यक्रम यासंदर्भात राज्याची योजना व अपेक्षित गुंतवणूक याबाबत राज्याच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी चर्चा व प्रश्नोत्तरेही झाली. त्यानुसार तायपेई शिष्ठमंडळाने महाराष्ट्रात स्मार्ट शहर उभारणीत विशेष रस दर्शविला आहे. स्मार्ट शहरांमध्ये पायाभूत सेवांसोबतच डिजीटल सेवांच्या माध्यमातून प्राथमिक सेवा पुरविण्यात तायपेई सकारात्मक असल्याचे या शिष्ठमंडळाने सांगितले. यासह समुद्री पर्यटन व समृध्दी महामार्ग प्रकल्पात अत्याधुनिक रहदारी नियंत्रण यंत्रणा पुरविण्याबाबत आणि कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत महिला सबलीकरणाच्या कार्यात गुंतवणुकीसाठी तायपेई सरकार व येथील अन्य खाजगी कंपन्या सकारात्मक असल्याचे तायपेई शिष्ठमंडळाने सांगितले. गुंतवणुकीसाठी राज्यात असलेले पोषक वातावरण आदिंची माहिती यावेळी श्री. म्हैसकर यांनी शिष्ठमंडळाला दिली.
      
महाराष्ट्र-तायपेई नितीविषयक पुढाकारासाठी स्थापन कार्यगटाची पहिली बैठक सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. यापुढील बैठकांमधून राज्य सरकार आणि तायपेयी सरकार यांच्या उचित समन्वयाने गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्थ होणार असल्याचा विश्वास यावेळी श्री. येरावार यांनी व्यक्त केला.