१३ जूनला महाराष्ट्रात रेल व रस्ता रोको – आ.बच्चू कडू यांची माहिती

0
754
Google search engine
Google search engine

        (औरंगाबाद)-


महाराष्ट्रातील शेतकरी चहूबाजूने अडचणीत सापडले आहेत.खरिपाची पेरणी आणि शाळेचा खर्च तोंडावर असताना बॅकांची सर्व खाती थकलेली आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने पैशाची गरज आहे.देवेंद्र सरकारने रेडी रेकनर प्रमाणे तातडीने शेतीकर्ज उपलब्ध करुन द्यावे.या प्रमुख मागणीसाठी मंञ्यांना गावबंदी,१२ जूनला तहसिल,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि १३ जून २०१७  रोजी महाराष्ट्रातील सर्व रेल्वे आणि रस्ता वहातुक अडविण्यात येईल अशी माहिती शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य आ.बच्चू कडू यांनी पञकार परिषदेत दिली.शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यावेळी उपस्थित होते.
शेतकरी संपावर आंदोलनाचा १ जून ते ७ जून असा यशस्वी टप्पा झाल्यानंतर सुकाणू समितीची नाशिकच्या तुपसाखरे लॉन्स येथे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.महाराष्ट्रातून सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली.शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी, शेतीमालावरिल निर्यातबंदी उठवावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च+५०%नफा द्यावा आणि शेतकऱ्यांना रेडी रेकनर प्रमाणे तातडीने शेतीकर्ज द्यावे.या मागण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय केला.बैठकीला रघुनाथदादा पाटील,अनिल घनवट,डॉ.अजित नवले,नामदेव गावडे,राजू देसले,खा.राजू शेट्टी,आ.भाई जगताप,आ.भाई जयंत पाटील,माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे आदि.महत्वाच्या नेत्यांनी देवेंद्र सरकारला वठणीवर आणण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे.
पञपरिषदेत आ.बच्चू कडू म्हणाले की,सन २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने नरेंद्र आणि देवेंद्र सरकार विसरले आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न घसरले आहे.सरकारने  विदेशातून खाद्यतेल,दाळी,कांदा,कापूस,साखर, चढ्या भावाने आयात केली. माञ महाराष्ट्रातील तुरखरेदीचे पैसे दिले नाहीत.बुलेट ट्रेन,कोस्टल रोड,समृध्दी मार्गासाठी हजारो कोटींची उधळपट्टी करणारे देवेंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे.सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणारे सरकार अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करित नसेल तर त्यांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी १३ जूनच्या रेल आणि रस्ता रोको आंदोलनात सर्वशक्तीने उतरावे असे आवाहन त्यांनी केले.आपचे हनुमंत चाटे यांनी प्रास्ताविक केले.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश बारगळ यांनी आभार मानले.