पत्रकारितेत सामाजिक बांधीलकी महत्वाची – खा. आनंदराव अडसूळ

0
671

अमरावती आयआयएमसी केंद्रात पत्रकारितेचा मराठी अभ्यासक्रम सुरु

अमरावती-

योग्य माहिती सर्वदूर पोहोचणे हे विकास प्रक्रियेसाठी आवश्यक असते. ती गरज पत्रकारिता पूर्ण करते. त्यामुळे पत्रकारितेत सामाजिक बांधीलकी जोपासली गेली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले.
भारतीय जनसंचार संस्थेच्या (आयआयएमसी) अमरावती येथील केंद्रात पत्रकारितेच्या मराठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ आज स्काईपच्या माध्यमातून झाला. नवी दिल्ली येथील आयआयएमसीच्या सभागृहात पार पडलेल्या या उद्घाटन समारंभात श्री. अडसूळ बोलत होते. संस्थेचे महासंचालक के. जी. सुरेश, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी, विजय सालोकार उपस्थित होते.
श्री. अडसूळ म्हणाले की, पत्रकारितेत सामाजिक मूल्यांचे भान जपणे महत्वाचे आहे. भाषिक वृत्तपत्रांनी व प्रसार माध्यमांनी हे भान जोपासले आहे. पत्रकारिता ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरली गेली पाहिजे. मातृभाषेतून व्यक्त होणे सहजसुलभ असते. मराठी पत्रकारितेला गौरवशाली इतिहास लाभला आहे. अमरावती येथील केंद्रात मराठी अभ्यासक्रम सुरु होणे ही आनंदाची बाब आहे. येथून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे महासंचालक के. जी. सुरेश म्हणाले की, लोक स्थानिक भाषांमध्ये बातम्या वाचणे, ऐकणे अधिक पसंत करतात. स्थानिक भाषेतील पत्रकारिता ही मातीशी जुळलेली असते. ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम भाषिक माध्यमे अधिक चांगल्या पद्धतीने करतात. अमरावतीत सुरु झालेल्या अभ्यासक्रमाचा फायदा पूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना होईल, असेही ते म्हणाले.
श्री. जोशी म्हणाले, काय लिहावे-बोलावे हे शिकण्यापेक्षा काय लिहू-बोलू नये, याचे शिक्षण घेणे महत्वाचे आहे. माध्यमांवर लोकजागृतीची महत्वाची जबाबदारी आहे. ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. श्री. सालोकार म्हणाले, पत्रकारितेच्या शिक्षणात मूल्य अत्यंत महत्वाची असतात. विश्वासार्हता जपण्यासाठी माध्यमांनी वस्तुनिष्ठतेचे गांभीर्य जपले पाहिजे.
प्रा. हेमंत जोशी, प्रा. गीता बामजेई यांनीही मनोगत व्यक्त केले. अमरावतीच्या अभ्यासक्रम संचालक प्रा. अश्विनी कांबळे यांनी संवाद साधला. केंद्राचे संचालक प्रा. नदीम खान यांनी आभार मानले.