मारेकर्‍यांची नव्हे, तर सनातनच्या साधकांची माहिती देणार्‍यांना पारितोषिक घोषित करणे, हा पोलिसांचा पूर्वग्रहदूषितपणा ! – श्री अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

0
642
Google search engine
Google search engine

कोल्हापूर –

 

 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण असो वा कॉ. पानसरे हत्या प्रकरण, कोणताही पुरावा नसतांना सनातनच्या निष्पाप साधकांना या प्रकरणांमध्ये गोवून त्यांचा छळ करण्यात येत आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेले निष्पाप श्री. समीर गायकवाड यांना तब्बल २१ मास कारागृहात काढावे लागले आणि नुकताच त्यांना जामीन मिळाला, तर डॉ. वीरेंद्र तावडे हे गेले वर्षभराहून अधिक काळ तुरुंगवास भोगत आहेत. हे अल्प होते म्हणून कि काय, ज्या दोघांचा गेली काही वर्षे काहीच थांगपत्ता नाही, असे श्री. सारंग अकोलकर आणि श्री. विनय पवार यांच्या नावे १० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करून कोल्हापूर पोलिसांनी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न केला आहे. या दोघांवर पोलिसांचा संशय असल्याने त्यांच्यावर पारितोषिक घोषित करण्यावर सनातन संस्थेचा आक्षेप नाही; मात्र कोणतेही ठोस पुरावे नसतांना आणि चौकशी अपूर्ण असतांना याच दोघांची माहिती देण्यासाठी पारितोषिक घोषित करणे अयोग्य आहे. पानसरे हत्येप्रकरणी मारेकर्‍यांची माहिती देणार्‍यांना पारितोषिक असे घोषित केले असते, तर ते सयुक्तिक ठरले असते; मात्र असे न करता जाणीवपूर्वक सनातनच्या साधकांना गुंतवण्याचा प्रयत्न, हा पोलीस प्रशासनाचा सनातनविषयीचा (तथाकथित विवेकवाद्यांच्या दबावामुळे निर्माण झालेला) पूर्वग्रहदूषितपणा आहे आणि यामुळेच हा तपास भरकटला आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

श्री. वर्तक यांनी पुढे म्हटले आहे की, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील भ्रष्टाचार उघड केला अन् त्याची सीआयडी चौकशी चालू झाली.

या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तीने एकाएकी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सहभाग असल्याची टीप पोलिसांना दिली अन् त्याने सांगितलेले वर्णन श्री. सारंग अकोलकर आणि श्री. विनय पवार यांच्याशी जुळले, हा योगायोगच आहे; पण डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वापरलेले आणि नागोरी याच्याकडून जप्त केलेले पिस्तूल वर्ष २०१३ पासून पोलिसांच्या ताब्यात असतांना ते वर्ष २०१५ मध्ये पानसरे यांच्या मारेकर्‍यांकडे कसे पोहोचले आणि पुन्हा ते पोलिसांकडे कसे आले, याचे अन्वेषण करण्याविषयी ब्रदेखील कोल्हापूर पोलिसांनी काढलेला नाही, हे अनाकलनीय आहे.

कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडे जी विविध पत्रे आणि तपशील येत आहेत, त्यापैकी पोलिसांनी पूर्वग्रहदूषितपणाने लक्ष्य बनवलेल्या विशिष्ट संघटना आणि व्यक्ती सोडून इतरांच्या संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती कचर्‍याच्या टोपलीत टाकण्याचे धोरण पोलिसांनी स्वीकारले आहे. त्यामुळे हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी असाच आहे, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.