मुलींनी स्व -संरक्षणाचे धडे घेणे काळाची गरज -शिक्षणाधिकारी ••• यशवंत विद्यालयात महिला संरक्षण शिबीर

0
3326
Google search engine
Google search engine

वर्धा –

आज मुली शिक्षण व नोकरीसाठी बाहेर पडतात. वृत्तपत्रात रोज घडणा-या मुली व महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाचून मन धास्तावते. त्यामुळे आजच्या काळाची गरज म्हणून मुलींनी स्व- संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक ठरत आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एल.एम. डूरे यांनी केले.
राज्य महिला आयोगाच्या वतीने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी 5 दिवसाचे कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यातील सेलू तालुक्यातील शिबीर यशवंत विद्यालायत घेण्यात येत आहे. याच्या शुभारंभ प्रसंगी श्री डूरे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक संगीता वानखडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजना दाते, पर्यवेक्षिका, तसेच कराटे प्रशिक्षण देणारी कराटे पटू सायली वाघ आणि तिची चमू उपस्थित होती.
पुढे बोलताना श्री डूरे म्हणाले, ग्रामीण भागातील मुली शाळेत जाण्यासाठी बस, ऑटोरिक्षा इत्यादी साधनांचा वापर करतात. अशावेळी त्यांच्यासोबत गैरप्रकार होत असतात. या कारणांमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविण्यास पालक धजावत नाही. पण मुलींनी स्व संरक्षणाची माहीत करून घेतल्यास त्या स्वतःचे संरक्षण स्वत: करू शकतील. या एका प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होऊन त्या आलेल्या प्रसंगांना धाडसाने सामना करतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मनीषा सावळे म्हणाल्या, पूर्वीच्या काळातही महिला, मुली घराबाहेर पडल्यात की त्यांना पाहून शेरेबाजी व्हायची, आणि आजही होते. याचा अनुभव प्रत्येक महिलेला आयुष्यात एकदातरी येतोच. आज ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षणासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची गरज आहे. पण विकृत प्रवृत्तीमुळे आज मुली, महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वत:चे संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन मुलींनी कराटे प्रशिक्षण शिकून घ्यावे. संरक्षित भविष्यासाठी आज ही काळाची गरज बनली आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
संगीता वानखेडे यांनी राज्य महिला आयोगाला मुलींच्या संरक्षणाची काळजी आहे म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलींनाच स्व संरक्षणाचे धडे देण्याचे काम महिला आयोगाने हाती घेतले आहे ,असे सांगितले. यासाठी जिल्ह्यात हिंगणघाट, सेलू, आणि देवळी या तीन तालुक्यात असे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. याचा लाभ मुलींनी करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रंजना दाते यांनी या प्रशिक्षणाचा लाभ शाळेतील इयता 9 वी आणि 10 वी च्या 200 विद्यार्थिनींना होणार आहे. शाळेत 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून मुली शाळेत येतात. अशावेळी अशाप्रकारचे प्रशिक्षण मुलींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास मिळवून देते. प्रशिक्षणासाठी यशवंत विद्यालयाची निवड केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. काराटेपटू सायली वाघ आणि तिच्या चमूने शाळेतील 200 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहे. तसेच दिपचंद शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा याचा लाभ घेतील. अशाच प्रकारचे प्रशिक्षणही हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातही आयोजित केले आहे.