मदर डेअरीच्या नागपूर दूग्ध शाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन -मदर डेअरीकडून 65 कोटींची गुंतवणूक -विदर्भातून होणार दूध खरेदी -100 दूध केंद्राचे सहाय्य घेणार

0
755

नागपूर –

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि मदर डेअरी ॲण्ड व्हेजीटेबल प्रायव्हेट लिमीटेडच्या वतीने नागपूर येथे उभारण्यात आलेल्या नवी दुग्धशाळा तसेच मदर डेअरी दूधचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, सुनील केदार, एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप राठ, विभागीय आयुक्त अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकार आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यात 14 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या करारानुसार हा नवीन प्लाँट असणार आहे. मदर डेअरी फ्रुट ॲण्ड व्हेजीटेबल प्रायव्हेट लिमीटेड ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची उपकंपनी असून ती या प्लाँटची जबाबदारी सांभाळणार आहे. नागपूर प्लाँट अत्याधुनिक करण्यासाठी मदर डेअरीने याठिकाणी 65 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. 
सुरवातीच्या तीन वर्षांत 11 जिल्ह्यातील 3 हजार गावांमध्ये 60 हजार शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले जाणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शहराच्या विक्री नेटवर्कच्या विकासाच्या दृष्टीने मदर डेअरीकडून मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. यासाठी 100 दूध केंद्राचे सहाय्य घेण्यात येणार आहे. नागपूरात सुरु होत असलेल्या डेअरी प्रकल्पाची व्याप्ती वाढताच एनडीडीबी व अधिपत्याखालील संस्था प्रकल्पाचे रूपांतर शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्थेत करण्याचे काम सुरू करतील. जेणेकरुन शेतकरी स्वत: याचे नियंत्रण करुन एकत्रितपणे फायदे मिळवू शकतील.
उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी प्लाँटची पाहणी केली. दुग्धशाळा परिसरात मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. मदर डेअरीच्या वतीने उभारण्यात आलेल्या विक्री केंद्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मदर डेअरीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.