घरकुल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईसाठी थेट पोलीसात तक्रार – जळगाव घरकुल घोटाळ्याच्या पुनरावृत्तीचे संकेत – अनेक वर्षापासुन फिर्यादी गौतम जवंजाळ देत आहे लढा

0
735
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे:- ( शहेजाद खान  )


मानवाच्या अन्न ,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहे. शासनाच्या वतीने सुद्धा या गरजा पूर्ण करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न केले जातात. परंतु चांदुर रेल्वे नगर येथील नगर परिषद मार्फ़त देण्यात आलेले घरकुल गरजुंना न देता ही घरकुले चक्क नगर परिषदेचे माजी नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी व ज्यांना आवश्यकता नाही अशा व्यक्तिंना लाभ झाल्याने येथील सच्चा समाजसेवक गौतम अण्णाजी जवंजाळ भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी अनेक वर्षापासुन लढा देत आहे. अधिकाऱ्यांना पुरावे देऊन सुध्दा कारवाई होत नसल्यामुळे शेवटी फिर्यादी गौतम जवंजाळ यांनी दोषींवर फौजदारी कारवाई होण्याकरीता पुराव्यासह थेट चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी तक्रार केली आहे. या तक्रारीवर कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
            महाराष्ट्रभर गाजलेल्या जळगावच्या मोठ्या घरकुल घोटाळ्या सारखा घरकुल घोटाळा चांदुर रेल्वे नगर परिषदेमध्ये झाल्याचे समजते. सर्वसामान्य नागरीकांऐवजी घरकुलाचा लाभ माजी नगरसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी व ज्या लोकानां घरकुलाची आवश्यकता नसताना एकाच घरी दोन-दोन, तिन-तिन घरकुलाचा लाभ देण्यात आला. हाच भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ लढा देत आहे. यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे सुध्दा केली. पुरावे देऊन सुध्दा कारवाई न झाल्याने जवंजाळ यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे सन २००८-०९ साली आंबेडकर वाल्मीकी घरकुल योजनेंतर्गत शहरात घरकुलाचे वाटप झाले. तसेच त्यानंतर सन २०१०-११, २०११-१२ व २०१२-१३ या तीन वर्षांमध्ये समाज कल्याण विभागामार्फत घरकुलांचे वाटप झाले. त्यानुसार संबंधित धारकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मोबदला देण्यात आला. संबंधित वरील दोन्ही घरकुल वाटप योजनेमध्ये वाटप करतांना अपात्र धारकांना त्याचा लाभ देण्यात आला. यामध्ये अपात्र व्यक्तींना सदर्हु योजनेचा नियमबाह्य लाभ देण्यात आला असुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून शासनाच्या रूपयाचा अपहार, दुरूपयोग व गैरव्यवहार केलेला आहे. यामध्ये  योजनेमध्ये कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी तथा कर्मचारी यांचा समावेश आहे. शासनाची फसवनुक करणाऱ्या व शासनाच्या रक्कमेचा दुरूपयोग करणाऱ्या संबंधित अधिकारी तथा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे अनिवार्य व न्याय संगत आहे. परंतु संबंधित अधिकाऱ्यांचे हित संबंध गुंतलेले असावेत म्हणुन कदाचित संबंधीत फसवणुक, अपहार व दुरूपयोग करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच अपात्र लाभ धारकाविरूध्द फिर्यादी दाखल केलेली नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यामुळे चांदुर रेल्वे नगरीचे सामान्य नागरीक म्हणुन गौतम जवंजाळ यांनी गुरूवारी स्थानिक पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली आहे.
     अपहार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अपात्र ज्यांनी नियमांची पायमल्ली करून बनावट व खोट्या दस्ताऐवजाच्या आधारे नियमबाह्य शासनाची फसवणुक करून लाभ मिळवला व शासनाच्या रक्कमेचा अपहार केला, अशा धारकाविरूध्द चौकशी होऊन त्यांच्या विरूध्द कायदेशीर फौजदारी कार्यवाही होण्याकरीता संबंधित प्रकरणाच्या चौकशी अहवालाची प्रत तसेच इतर आवश्यक दस्ताऐवजांसह फिर्यादी दाखल केली आहे. या तक्रारीवर स्थानिक पोलीस कोणती कारवाई करणार व जळगाव घरकुल घोटाळ्याची पुनरावृत्ती शहरात होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.



नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज !

या गंभीर प्रकरणाकडे तत्कालीन जिल्हाधिकारी  यांनी पुर्णत: दुर्लक्ष केले होते. चांगल्या कार्यपध्दत शैलीमुळे नवीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची काही दिवसातच चांगले अधिकारी म्हणुन जिल्ह्यात ओळख सुध्दा झाली आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडुन आता या प्रकरणामध्ये लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांनी लक्ष दिल्यास या प्रकरणामध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.