महाराष्ट्राला राष्ट्रीय ‘गोपाल रत्न आणि कामधेनु पुरस्कार’

0
636
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली :-

धुळे जिल्ह्यातील विक्रांतसिंह रावल यांना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते आज गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील पुसा राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातील ऐ.पी. शिंदे सभागृहात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक दुग्ध दिना’चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री सुदर्शन भगत, पशु सवंर्धन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय सचिव देवेंद्र चौधरी मंचावर उपस्थित होते. यावर्षीपासूनच ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत राष्ट्रीय गोपाल रत्न आणि कामधेनु पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील  विक्रांतसिंह रावल यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रूपये रोख प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असे आहे. श्री रावल हे महाराष्ट्र राज्य दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्यादित, (महानंद) मुंबईचे  संचालक आहेत. श्री रावल यांचे कुटुंब अनेक पिढयांपासून देसी गोपालन करते. अस्सल गिर जातींच्या गायीचे पालन रावल कुटुंब करते. यासह गायींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय, पशु मेळावे घेणे, शेतक-यांसाठी शिबीर आयोजित करणक, देशी गोवंशाची वाढ व्हावी यासाठी प्रचार-प्रसार करणे, स्थानीक शेतक-यांना पशुधन योग्य दरात उपलब्ध करून देणे आदी कामे. याशिवाय गायीपासून दुग्ध, गोमुत्र, गायीच्या शेणापासून गौरी, देशी गायीचे तूप, सेंद्रीय खत आदीचे उत्पादनही करते.
पुण्यातील ‘वृंदावन थारपरकर देसी कॉव क्लब’ला आज ‘राष्ट्रीय कामधेनु पुरस्कारा’ने केंद्रीय कृषी मंत्री यांच्याहस्ते दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, प्रशस्तीप्रत्र असे आहे. काही मित्रांनी मिळुन तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या या क्लबमध्ये सुरूवातीला केवळ 6 थारपरकर जातीच्या देसी गायी होत्या, आज त्यांची संख्या वाढून 147 इतकी झाली. यासह क्लब सदस्यांची संख्या सुरूवातीला 15 होती तीही वाढून 137 झालेली आहे. क्लबच्यावतीने थारपरकर जातींच्या गायींना अतिशय पोषक वातावरण दिले जाते. गायीच्या दूधापासून, मुत्रापासून आणि शेणापासून  शेतकरी उपयोगी, गृहपयोगी वस्तु उत्पादन क्लबच्यावतीने केले जाते.