सुकाणु तालुकास्तरीय समीतीची बैठक संपन्न – १४ ऑगस्ट विरूळ चौकात करणार ‘चक्काजाम’ आंदोलन – आम आदमी पक्षही होणार सहभागी

0
972

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारच्या मंत्रीनगर व सुकाणू समितीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यामुळे सुकाणू समितीने तीव्र आंदोलनाला तात्पुरती स्थगीती दिली होती. विशेष प्रकारच्या अटी व शर्ती लावून शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून कसे वंचित ठेवता येईल. याचाच प्रयत्न सरकारने केला. तांत्रिकतेच्या जाळय़ात (कर्जमाफी अर्ज भरताना) शेतकर्‍यांचा जिव गुदमरतो आहे. काहीही केले तर सरकार आमच्या पाठीशी नाहीच आहे. त्याचमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या फसव्या कर्जमाफीचा निषेध करीत सुकाणु समितीने जनतेत जाण्याचा निर्णय घेतला व त्या शेतकरी जनजागृती यात्रेचे रूपांतर पुणे येथील महामेळाव्यात होवून शेतकर्‍याची आंदोलन अधिक तीव्र करण्याचे ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून १४ ऑगस्ट २०१७ ला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वव्यापी रास्ता रोको करणार आहे. याच अनुषंगाने चांदुर रेल्वे शहरात सुध्दा १४ ऑगस्टला विरूळ चौकात दुपारी १२ वाजता रास्तारोको करण्यात येणार आहे. यासंदर्भात सुकाणु तालुकास्तरीय समीतीची बैठक कॉ. विनोद जोशी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पार पडली.
या बैठकीला प्रभुराज इंगळे, कॉ. विनोद जोशी, कॉ. देविदास राऊत, कडु, सौरभ इंगळे, विजय रोडगे, पेठे आदींची उपस्थिती होती.यावेळी १४ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाबद्दल चर्चा करण्यात आली. सदर आंदोलनामध्ये प्रहार शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र किसान सभा या पक्ष, संघटनांचा सहभाग राहणार आहे. तसेच आम आदमी पार्टी चांदुर रेल्वे तालुका स्तरावर सहभागी राहणार असल्याची माहिती आपचे अमरावती संयोजक तथा माजी न.प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी दिली. 

सदर आंदोलन शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करावी, पुढील पिकाकरीता बिनव्यापी कर्ज सरकारने द्यावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करून शेतकर्‍याला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा एकत्र करून आधारभाव जाहीर करावा, प्राण्यापासून पिकांचे नुकसानी दाखल शासनाने दर हेक्टरी ७५ हजार रूपये नुकसान भरपायी द्यावी, वन विभागाच्या सिमा कंपाउंड घालुन बंद करण्यात व शेतकर्‍याच्या शेतीला तारेचे कुंपन द्यावे तसेच पिक विमा निकषात वन्य प्राण्याच्या नुकसानीचा समावेश करावा इ. मागण्यांसाठी होणार आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुकाणु तालुका स्तरीय समीतीच्या वतीने करण्यात आले आहे. यापुर्वी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सरपंचांना १५ ऑगस्टला ध्वजारोहण न करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले होते.