रेल्वे थांब्यासाठी आयोजीत स्वाक्षरी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद -रेल रोको कृती समितीचे आयोजन

0
1202

हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन नितीन गवळींच्या नेतृत्वात दिल्ली रेल्वे बोर्डात देणार

 

शहेजाद खान / चांदूर रेल्वे –   

 

निवडणुकीपुर्वी प्रचार सभेत प्रत्येक पक्षाचे उमेदवार कोणते न कोणते आश्वासन जनतेला देत असतो. अनेक उमेदवार आपण दिलेले आश्वासन पुर्ण करून जनतेचा असलेसा विश्वास कायम ठेवतात. मात्र वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी खोट्या आश्वासनाचा उच्चांक गाठुन चांदुर शहरात एक नवीन विक्रम प्रस्तापीत केला आहे. रेल्वे थांब्याचे खोटे आश्वासन तब्बल चार ते पाच वेळा दिले. यामुळे शेवटी आता रेल रोको कृती समिती पुन्हा  आक्रमक झाली असुन बुधवारी संपुर्ण शहरात स्वाक्षरी अभियान राबविले. हजारो स्वाक्षरी असलेले निवेदन लवकरच नितीन गवळी यांच्या नेतृत्वात नागपुर व दिल्ली रेल्वे बोर्डात देणार आहे.
चांदुर रेल्वे शहराच्या आजुबाजुने जवळपास ५०-६० गावे लागलेली आहे. दररोज शेकडो नागरीक शहरातुन ये- जा करतात. नागरीकांसह व्यापाऱ्यांना नेहमीच दुरवर प्रवास करावा लागतो. मात्र शहराला अनेक मुख्य रेल्वे गाड्यांचे थांबे नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. यामुळे रेल रोको कृती समीतीतर्फे जबलपुर एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस, नागपुर पुणे एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आदी गाड्यांच्या थांब्यासाठी १५ ऑक्टोबर २०१२ ला भव्य जनआंदोलन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे थांब्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडुन मिळाले होते. तसेच तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी ही रेल्वे थांब्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते दोन्ही आश्वासन हवेतच विरले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी शहरवासीयांची मुख्य असलेली रेल्वे थांब्याची मागणी पुर्ण करणार असल्याचे आश्वासन शहरवासीयांना दिले होते. निवडणुकीनंतर शहरात ४-५ वेळा आल्यानंतर खासदार एकच आश्वासन देत गेले की तुमच्या शहराला रेल्वेचा थांबा मिळवुन देणारच व नाही दिल्यास चांदुर शहरात पायसुध्दा ठेवणार नाही असे सांगितले. मात्र खासदार साहेब प्रत्येकवेळी शहरात पाय ठेवतच गेले. त्यांच्या एकच एक डायलॉगने शहरवासी त्रस्त झाले आहे. अशातच खासदारांच्या खोटारड्यापणाची पोल सुध्दा खुलली आहे. यानंतर आता रेल रोको कृती समीतीचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहे.  बुधवारी संपुर्ण शहरात स्वाक्षरी अभियान राबविले. या स्वाक्षरी अभियानाला विद्यार्थी, व्यापारी, तरूण-तरूणी, वयोवृध्द तसेच शहवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. एकाच दिवसात हजारोच्या संख्येने स्वाक्षरी करण्यात आली. हजारो स्वाक्षरी असलेले निवेदन रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांच्या नेतृत्वात नागपुर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच दिल्ली रेल्वे बोर्डातील संबंधित अधिकाऱ्याला प्रत्यक्ष भेटुन रेल्वे थांब्याची मागणी करण्यात येणार आहे. रेल्वे थांब्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असुन वेळ पडल्याच आंदोलन सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वाक्षरी अभियानामध्ये रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी, कॉ. विजय रोडगे, मेहमुद हुसेन, कॉ. विनोद जोशी, विनोद लहाने, अजय चुने, गोपाल मुरायते, निलेश (बबलु) कापसे, गौतम जवंजाळ, भिमराव खलाटे, सुरेश यादव, त्रिलोक माणकानी, गजानन यादव, पंकज गुडधे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.