सरकारचे धोरण म्हणजे “मर जवान, मर किसान” – खा. राजू शेट्टी <<><>> चहा वाले पंतप्रधान झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असे वाटले, पण निराशाच पदरी पडली.

0
680

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )

 – सरकारचे धोरण म्हणजे “मर जवान, मर किसान” असेच आहे. सीमेवर देखील आमच्या शेतकऱ्यांची पोरेच शहीद होत आहेत. तर गावात शेतकरी कर्जबाजारी होऊन गळफास घेतोय. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याची टीका स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी केली. आत्मक्लेश यात्रा आज मुंबईच्या वेशीवर मानखुर्द येथे आली, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती पुन्ही बिघडल्याने त्यांना रस्त्याच्या बाजूलाच आय. व्ही लावण्यात आले. तरीही त्यांनी पदयात्रा सुरूच ठेवले. मानखुर्द येथे जनता दल युनायटेडच्या वतीने आत्मक्लेश यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान पुर्वी चहा विकत होते. त्या चहामधील साखर व दूध ही शेतकऱ्यांचीच आहे. मला वाटले शेतकऱ्यांना आत अच्छे दिन येतील पण तीन वर्षात शेतकऱ्यांना सरकारने मरणाच्या सरणावर झोपवले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच माझ्या शेतकऱ्यांची लूट करून हे राज्यकर्ते राज्य करत आहेत. कर्जमाफी मागत नाही तर कर्जमुक्ती मागतोय. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार आले आहे. ते शेतकरी तुमचा अंत करतील. लुच्च्या सरकारला निवडून दिल्याचा आम्हाला पश्चाताप होतोय. सरकारचे धोरण म्हणजे “मर जवान, मर किसान” असेच आहे. सीमेवर देखील आमच्या शेतकऱ्यांची पोरेच शहीद होत आहेत. तर गावात शेतकरी कर्जबाजारी होऊन गळफास घेतोय. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. यांचे धोरण आमचे मरण आहे. माझ्या अंगातील क्षाराचे प्रमाण कमी झाल्याने थोडासा अशक्तपणा आलता. पण मी आता ठीक आहे. मी मनाने कणखर आहे. हतबल नाही. मी थांबणार नाही. येथून पुढे एका नव्या चळवळीच्या पर्वास प्रारंभ होईल. नरेंद्र मोदी सरकारने बाहुबलीच्या रूपात जाहिरात दिली आहे. पण शेतकऱ्यांचे त्यांचे धोरण पाहत भल्लालदेव वाटू लागलेत. कर्जमुक्तीला विरोध करणारे बिज्जलदेव देखील सरकारमध्ये आहेत. तुमची नौटंकी सहन करणार नाही. कपिल पाटील म्हणाले, सदा सर्वदा शेतकऱ्यांचा नेता केवळ राजू शेट्टीच आहेत. कोण आला काय, गेला काय, चळवळ थांबत नाही, शेतकरी आंदोलनात आमचा पाठिंबा आहे. यावेळी रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, हंसराज वडगुले, देवेंद्र भुयार, सावकर मादनाईक, मिलिंद साखरपे,  माणिक कदम, भगवान काटे, राजू तळसंगी आदी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी चे आ. हसन मुश्रीफ यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.