कृषी राज्यमंत्र्यांची मृत शेतकरी कुटुंबाला भेट- रुग्णालयातील शेतक-यांचीही केली विचारपूस

0
866
Google search engine
Google search engine

यवतमाळ :-

किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी येथील दीपक मडावी यांचा गत महिन्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मृतक दीपक मडावी यांचे वडील श्याम मडावी, दीपकची पत्नी आणि मुलगी वैष्णवीचे सांत्वन केले. यावेळी कृषी उपसंचालक पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आत्माचे प्रकल्प संचालक दत्ता काळे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी डी.आर.कळसाईत आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री खोत यांनी श्याम मडावी यांच्याशी चर्चा केली. गावात कृषी विभागाचे अधिकारी येतात का. फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहायक तसेच औषधी विक्रेते व किटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करतात का. गावात ग्रामसेवक किती दिवासांनी येतात. विषबाधा झाल्यानंतर दीपक किती दिवस दवाखान्यात भरती होते, याबाबत विचारणा केली. यावेळी श्याम मडावी यांनी सांगितले की, दीपक तीन दिवसांपासून फवारणी करत होता. बाहेर रोजंदारीवरसुध्दा फवारणीसाठीसुध्दा जात होता. दोन-तीन दिवसानंतर त्याची तब्बेत बिघडली आणि रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसानंतर दीपकचा मृत्यु झाला.
घरी चार एकर शेती आहे. एक एकर त्याला मक्त्याने दिली होती. सातबारा माझ्याच नावावर आहे. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आठवड्यातून एक-दोनदा येतात, असे श्याम मडावी यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री खोत यांनी दीपकच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. तसेच ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी यांनी नियमित गावात येऊन नागरिकांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करावे. ग्रामपंचायतीमध्ये याबाबत नोंदी अद्ययावत ठेवाव्यात आदी सुचना केल्या. राज्यमंत्री खोत यांनी दीपक मडावी ज्या शेतावर फवारणी करण्यासाठी गेले होते त्या शेतावर भेट दिली. तसेच लोणबेहळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. फवारणीबाधीत किती शेतकरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आले होते. त्यांना कुठे रेफर करण्यात आले, आदी बाबींची त्यांनी विचारपूस केली.
राज्यमंत्र्यांची रुग्णालयाला भेट : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन भरती असलेल्या विषबाधीत शेतक-यांची विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांना यावेळी त्यांनी धीर दिला. या रुग्णांच्या वैद्यकीय खर्चासाठी त्वरीत तरतूद करावी, असे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राठोड, मेडीसीन विभगाचे डॉ. येलके आदी उपस्थित होते.
0000000000