‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी रचले षड्यंत्र !

0
565

मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांचा गौप्यस्फोट

मालेगाव प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने विमानाने सोबत नेलेल्या ‘संग्राम सिंह’चे गूढ उघड

 

मुंबई – जिहादी आतंकवादी कारवायांत अन्वेषण यंत्रणेने मुसलमान आरोपींना अटक केल्यानंतर मुसलमानांमधील वाढती नाराजी लक्षात घेऊन त्यांना खूष करण्यासाठी देशात ‘हिंदु आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध करण्याचे षड्यंत्रच तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने रचले होते. त्या षड्यंत्राचा भाग म्हणून मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणात निरपराध हिंदुत्वनिष्ठांना अडकवण्यात आले. मुंबईतील आतंकवादविरोधी पथकाने त्यांना बेकायदा अटक करून आणि त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना या खटल्यात गोवले, असा आरोप या प्रकरणातील आरोपी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा भांडाफोड केला. या वेळी त्यांच्या समवेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी उपस्थित होते.

याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात या प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

१. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आठवडाभर कोठडीत बेकायदा डांबल्यानंतर २३.१०.२००८ या दिवशी अधिकृतपणे अटक केल्याचे दाखवण्यात आले.

२. त्याच्या दुसर्‍याच दिवशी सैन्याचा खबर्‍या म्हणून काम पहाणारे श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना देवळाली (नाशिक) येथून आतंकवादविरोधी पथकाने बळजोरीने बेकायदा कह्यात घेतले. त्यांना मुंबईत आणून त्यांचा अमानुष छळ केला आणि नंतर खाजगी विमानाने भोपाळला नेले.

३. श्री. सुधाकर चतुर्वेदींना बेकायदा कह्यात घेतलेले असल्याने या प्रवासात नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाला प्रवाशांची सूची पुरवतांना त्यांचे ‘संग्राम सिंग’ असे खोटे नाव दाखवण्यात आले.

४. भोपाळमध्ये पोहोचल्यावर श्री. चतुर्वेदी यांच्या भ्रमणभाषवरून श्री. समीर कुलकर्णी यांना संपर्क साधून त्यांनाही बळजोरीने कह्यात घेऊन त्याच विमानाने मुंबईत आणले.

५. भोपाळ विमानतळावर सुरक्षाव्यवस्थेसंबंधी झालेल्या गाजावाज्यामुळे मालेगाव स्फोट प्रकरणात संग्राम सिंह नावाच्या आरोपीला अटक झाल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ या दैनिकात २६ ऑक्टोबर २००८ या दिवशी प्रसिद्ध झालेे. प्रत्यक्षात संग्राम सिंह नावाची कुणीही व्यक्ती या खटल्यात नाही.

६. श्री. चतुर्वेदी यांच्याकडून त्यांच्या देवळालीच्या घराची चावी आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी काढून घेतल्यानंतर शेखर बागडे या पोलीस अधिकार्‍याने चतुर्वेदी यांच्या घरात आर्.डी.एक्स. टाकले.

७. बागडेंच्या संशयास्पद हालचाली मेजर प्रवीण खानझोडे आणि सुभेदार पवार यांनी पाहिल्या अन् तसा अहवाल भारतीय सैन्याच्या मुख्यालयाकडे पाठवला. श्री. चतुर्वेदींना बेकायदा डांबून त्यांचा अमानुष छळ केल्यानंतर माटुंगा पोलिसांनी त्यांना माटुंगा रेल्वेस्थानकाबाहेर पिस्तुलासह पकडल्याचे खोटे कागदपत्र बनवण्यात आले.

८. पुढे माटुंगा पोलिसांकडून आतंकवादविरोधी पथकाने श्री. चतुर्वेदी यांना अधिकृतपणे कह्यात घेतले. हा ताबा घेण्यापूर्वीच श्री. चतुर्वेदी यांची ‘ब्रेनमॅपिंग’ चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीत चतुर्वेदी यांना विचारण्यात आलेले सर्व प्रश्‍न मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंबंधी होते. कारागृहातून माहितीच्या अधिकारात चतुर्वेदी यांनी मिळवलेल्या माहितीवरून हे सिद्ध होते की,

अ. खाजगी विमानाने केलेल्या मुंबई ते भोपाळ या प्रवासात आतंकवादविरोधी पथकाचे ६ अधिकारी आणि संग्राम सिंह यांची नावे ‘प्रवासी’ म्हणून नोंदवलेली आहेत.

ब. अधिकृत अटकेपूर्वीच मालेगाव प्रकरणात श्री. चतुर्वेदी यांची ‘ब्रेनमॅपिंग’ चाचणी झाली.

९. आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात असतांना श्री. सुधाकर चतुर्वेदींच्या बाजूच्या कोठडीत ठेवलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांचा अमानुष छळ होत असल्यामुळे त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकून सर्वच आरोपींचे मन विदीर्ण होत असे.

१०. लाचलूचपत आणि खंडणी यांच्या आरोपावरून पुढे कारावास झालेले अरुण खानविलकर हे पोलीस अधिकारी ‘साध्वीला आणि तुम्हा सगळ्यांना अडकवण्याच्या वरून सूचना आहेत’, असे सांगत असत.

११. श्री. सुधाकर चतुर्वेदी यांच्याकडून सैन्याधिकार्‍यांची वैयक्तिक माहिती आणि सैन्याच्या अंतर्गत कारभाराविषयी माहिती घेण्यातच खानविलकर यांना विशेष स्वारस्य होते. हे सारे त्यांनी कोणत्या राजकारण्याच्या आदेशावरून केले आणि गोपनीय माहिती कुणाकडे पाठवली, याचे अन्वेषण होणार का ?

१२. हे सर्व प्रकार म्हणजे भारतात ‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे भासवून मुसलमानांना खुष करण्याचा तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांचा प्रयत्न होता. तसेच या अन्यायी पोलिसांना त्याची योग्य ती शिक्षा मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही केली असल्याचे श्री. सुधाकर चतुर्वेदी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.