गटांच्या माध्यमातून प्रत्येक गावात उद्योग सुरु व्हावेत – आमदार चरणभाऊ वाघमारे

0
707


भंडारा –  

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत स्वयं सहायता महिला बचत गटातील महिलांनी बँकेत जाऊन लाभ घेऊन लघु उद्योग सुरु करावे. यासाठी स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित विविध कौशल्य विकास प्रशिक्षण घ्यावे,असे आवाहन यावेळी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रसार-प्रचार होण्यासाठी बेरोजगार तरुण-तरुणी, बचत गटातील महिला यांचे करिता रोजगार उद्योग मार्गदर्शन मेळावा तसेच शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र तुमसर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा 23 मे 2017 रोजी संताजी मंगल कार्यालय तुमसर येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. 
या रोजगार उद्योग मार्गदर्शन मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पंचायत समिती सभापती कविता बनकर, माविम नागपूर विभागाचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक विजय बागडे, जिल्हा विकास प्रबंधक (नाबार्ड) संदीप देवगीरकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. वाय. सोनकुसरे, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक एस.बी.तिवारी यांच्यासह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती पाहिजे त्याप्रमाणात ग्रामीण भागामध्ये पोहचली नसल्यामुळे या योजनेपासून अनेक तरुण-तरुणी आणि महिला वंचित राहिलेल्या आहेत. त्यांना या योजनेची माहिती देऊन बचत गटातील महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व बँकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक विजय बागडे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांनी बँकेत येऊन योजनेची माहिती घेऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे तसेच याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
शक्ती लोकसंचालीत साधन केंद्र तुमसर च्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये वर्ष 2016-17 मधील केलेल्या कामाचे वाचन व्यवस्थापक मंदा साकुरे यांनी केले. यावेळी शक्ती सीएमआरच्या सचिव कुंदा राखडे यांचे राज्यस्तरावर राज्यस्तरीय शिखर संस्थेमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 यावेळी महिलांनी आपल्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे, संचालक एन. वाय सोनकुसरे यांनी तरुण-तरुणी, बचत गटातील महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे सांगितले. 
यावेळी विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, पंचायत समिती सभापती कविता बनकर, जिल्हा विकास प्रबंधक संदीप देवगीरकर, शक्ती सीएमआरसी अध्यक्षा श्रीमती मेश्राम, शक्ती सीएमआरसी सचिव कुंदा राखडे आदींनी मार्गदर्शन केले. 
या रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे सूत्रसंचालन उपजीविका समन्वयक भीमा बनसोड, यांनी तर आभार प्रदर्शन क्षमता बांधणी समन्वयक अनुसया देशमुख यांनी केले. या रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शक्ती लोकसंचालीत साधन केंद्राच्या सर्व सहयोगिनी, लेखापाल व कार्यकारिणी पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.