बाहुबलीने केले नाही मतदान…… म्हणून कटप्पाने घेतला प्राण

0
668
Google search engine
Google search engine
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून तो प्रत्येक पात्र मतदाराचा हक्क आहे आणि तो बजावायलाच पाहिजे. पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका 24 मे रोजी होत आहेत.यानिमित्ताने महानगरपालिका प्रशासनाने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त् जे.एस.सहारिया व सचिव शेखर चन्ने यांनी देखील प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या निवडणूकीविषयक कामकाजाची माहिती घेवून मार्गदर्शन केलेले आहे.
महानगरपालिका आयुक्त् राजेंद्र निंबाळकर यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवातून त्यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपल्या विभागात कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याचा हा आढावा…
पनवेल महानगरपालिकेची ही प्रथम निवडणूक असल्याने मतदानामध्ये 15 % ची वाढ होणेकरीता विशेष मतदान जनजागृती मोहिम राबविली आहे.यात जनजागृतीसाठी पारंपारिक बॅनर्स, पोस्टर्स व लाऊड स्पिकर व्यतिरिक्त चित्ररथ व पथनाट्य यासारख्या प्रभावी माध्यमांचा उपयोग करुन घेण्यात आला आहे. तसेच प्रेस कॉन्फरन्स व सोशल मिडियावरदेखील मतदान जनजागृती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशासकीय संस्था,बँका,हॉटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम राबविली जात आहे.शिवाय सर्व मतदारांना मतदान करणेविषयी आवाहन पत्राचे वाटप, स्थानिक वृत्तपत्रामधून जाहिरातीद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
अनोखा उपक्रम

मतदानानंतर फोटो काढून सेल्फी स्पर्धेत भाग घेऊन 25 % मालमत्ता करामध्ये सवलत मिळवा ही एक महत्वाची व उपयुक्त् अशी घोषणा करण्यात आली आहे. यात मतदारांनी कुटूंबासह मतदान केल्यानंतर सेल्फी फोटो काढून तो फोटो महानगरपालिकेच्या व्हॉटस्अॅप नं.9769012012 वर पाठवायचा. महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या फोटोंपैकी प्रत्येक प्रभागातील उत्कृष्ट 5 सेल्फी फोटो अशा एकूण 100 फोटोंची निवड करण्यात येईल आणि त्यांना महानगरपालिकेच्या सन 2017-18 च्या मालमत्ताकरातून 25% सुट देणेत येईल. असाही अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे रेडिओ सिटी (91.1) या एफएम चॅनलद्वारेही मतदारांमध्ये जनजागृती करणेकामी आवाहन करणेत आलेले आहे. यासाठी ऑडिओ क्लिप तयार करणेत आले असून ते दिनांक 24मे पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच गॅस सिलेंडर, हॉटेल, दुकान आस्थापना, रिक्षा, सोसायटीच्या आवारात मतदान जनजागृती होर्डिंग्ज् लावण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना हॉटेल्स, मॉल्स, रिक्षा, हॉस्पीटलमधून 20 % सूट देऊन लोकशाही बळकट करणेकामी संबंधित व्यावसायिक आस्थापनांना आवाहन करण्यात आले असून त्यास काही हॉटेल मालकांनी सकारात्म्क प्रतिसाद दिला आहे.
बाहूबलीला का मारले ..?
बाहुबलीने नाही केले मतदान म्हणून कटप्पाने घेतला त्याचा प्राण… अशा आशयाच्या जाहिरात फलकाने पनवेलकरांचे लक्ष वेधले जात आहे. आणि त्यातून मतदानासारखा महत्वाचा संदेश देण्याचा आगला वेगळा प्रयत्न महानगरपालिकेने केला आहे. या उपक्रमाची माहिती राज्य निवडणूक आयुक्त् यांना दिल्यानंतर त्यांनी देखील यास उत्स्फुर्त दाद देवून कौतुक केले. कारण यापूर्वी झालेल्या राज्यातील नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्यावेळी लोकप्रिय असलेल्या सैराटच्या आर्ची व परशाचे मतदान जनजागृतीविषयाचे पोस्टर निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले होते. त्यासही मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. बाहुबली असो किंवा सैराटच्या आर्ची व परशाने मतदानाचे केलेले आवाहन असो सिनेजगतातील या लोकप्रिय व्यक्तीरेखांचा उपयोग करुन प्रशासन जनतेकडे केवळ एकच आवाहन करते ते म्हणजे निवडणुकांमध्ये आपण जर मतदानासाठी पात्र असाल, तर निश्चितपणे मतदान करायलाच पाहिजे.

साभार -जिल्हा माहिती कार्यालय रायगड