शालेय विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाची सामान्यज्ञान स्पर्धा • तालुकास्तरावर 9 व जिल्हास्तरावर 16 नोव्हेंबरला आयोजन

0
694
Google search engine
Google search engine

भंडारा-

 

तरुण मतदार नोंदणी वाढावी तसेच निवडणूक व निवडणूक प्रक्रिया याबाबत तरुणांमध्ये जाणिव जागृती व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयेाजन देशपातळीवर करण्याचे ठरविले असून ही स्पर्धा आंतर शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्टीयस्तर अशा चार स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयात ही स्पर्धा 9 नोव्हेंबर- आंतर शालेय व 16 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरावर घेण्याचे ठरले आहे.
आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली या संबंधीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हयातील सामान्यज्ञान स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय उरकुडे, सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेद्र मेश्राम, उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अर्चना मोरे व सर्व तहसिलदार उपस्थित होते.
14 ते 17 वर्ष वयोगटातील आणि 9 वी ते 12 वी मधील भविष्यात नवमतदार म्हणून नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्याचे आयोगाचे निर्देश आहे. सदर स्पर्धा ही निवडणूक व निवडणूक प्रक्रिया या विषयावर होणार असून अखिल भारतीय स्तरावर आयोजित होणाऱ्या या स्पर्धेच्या एकूण 5 फेऱ्या होणार आहेत. भंडारा जिल्हयात ही स्पर्धा तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर आयोजित करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक व निवडणूक प्रक्रिया या विषयाचे साहित्य निवडणूक शाखेने पुरवावे, असेही त्यांनी सांगितले. शालेयस्तरावर स्पर्धेचे आयोजन करतांना मुलींचा सहभाग असेल याची पूरेशी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
तालुकास्तरावर विजेत्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 16 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाईल. जिल्हास्तरावरील फेरीमध्ये जिंकणारे विद्यार्थी राज्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. राज्यस्तर फेरी 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तर उपांत्य व अंत्यफेरी 11 ते 17 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. या सदर स्पर्धेकरीता आदर्श प्रश्नपत्रिका भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहे. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन जिल्हयाचे नाव देश पातळीवर उंचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.