जलयुक्त शिवारच्या कामामुळे काटोल नरखेड परिसरातील भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ संत्र्यासह इतर पिकांसाठी जलयुक्त ठरले वरदान

0
698
Google search engine
Google search engine

नागपूर –

काटोल नरखेड या संत्रा उत्पादक क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रचंड पाण्याच्या उपशामुळे सातत्याने खेाल जाणारी भूगर्भातील पाण्याची पातळी जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे पाण्याचे पुनर्भरण होऊन भूगर्भातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे डार्कझोनमध्ये असलेल्या भागासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. काटोलच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अनिता पठारे यांनी सांगितले. जलयुक्त शिवारच्या कामामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील सावरगाव, तपनी आणि सीपीखापा येथील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कृषी विभागातील काटोलचे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, काटोलचे तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे, नरखेडचे अजय साटे, मंडळ अधिकारी सुरेश डांगे, कृषी पर्यवेक्षक रामदास खरपळस, कृषी सहाय्यक केशव हेडावू, नरेंद्र सावध आणि जितू खसारे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता पी.एस.खोब्रागडे, शाखा अभियंता श्री. भागवतकर, जिल्हा परिषदेचे उप अभियंता श्री. भूत व सहाय्यक अभियंता श्री. भुडके तसेच महसूल व कृषी विभागाचे अभिकारी उपस्थित होते.
यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या 2015-16 गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम, विशेष घटक योजनाच्या माध्यमातून काटोल तालुक्यातील तपनी येथील सिमेंट नाला बांधकाम तसेच जिल्हा परिषद नागपूर लघूसिंचन उपविभाग नरखेडमधील सावरगाव येथील लांडगी नदीवरील कोल्हापुरी पध्दतीच्या बंधारा दुरुस्तीचे काम तसेच नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. 61 .43 लक्ष रुपये किमतीत बंधाऱ्याची लांबी 26 मीटर असून, उंची 3.50 मीटर आहे.लांडगी नदीवरील एकूण नाला खोलीकरणाची एकूण लांबी ही 920 मीटर असलेल्या नदीची क्षमता 30 हेक्टरवर पोचल्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमती डॉ. पठारे यांनी सांगितले.
सावरगाव येथील सिपी पाझर तलावातील गाळ काढून नेण्यास शेतकरी तत्पर झाले आहे. या तलावातून जवळपास अडीच ते तीन फूट गाळ काढता येणार आहे. राज्य शासनाच्या लोकसहभागातील योजनेला त्यामुळे पाठबळ मिळाले आहे. यावर्षी वळवाचा पाऊस लवकरच पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यात अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र पुढील वर्षी तलावातील पाणी जसजसे कमी होत जाईल तसतसा गाळ उपसून शेतीमध्ये टाकणार असल्याचे शेतकरी वोठेराम डहाळे यांनी सांगितले.
तर प्रगतशील शेतकरी ओमप्रकाश रेवतकर यांच्या शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यावर तीन सिमेंट नालास बंधारे बांधल्यामुळे त्याची 7.50 मीटर रुंद तर तीन मीटर खोल नाल्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची कूपनलिका ही फेब्रुवारी महिन्यात आटत असे. मात्र गतवर्षीच्या नाला खोलीकरण आणि बांधामुळे आजघडीला कूपनलिकेला भरपूर पाणी येत असून त्यांच्या शेतातील संत्रा बाग जोपासली गेल्याचे लघूसिंचन प्रकल्पाचे उपअभियंता पी. एस. खोब्रागडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, लघूसिंचन जलसंधारण कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आयोजित पत्रकार पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.