नुकसान झालेल्या धानासाठी प्रोत्साहन अनुदान देणार – राजकुमार बडोले <><> गोठणगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
1281
Google search engine
Google search engine

गोंदिया – 

जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे 25 टक्के शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केलेली नाही. अवकाळी पावसामुळे व वादळामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आता तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धानाची नुकसान भरपाई म्हणून प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे 28 ऑक्टोबर रोजी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उदघाटन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, पं.स.सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, रघुनाथ लांजेवार, उपविभागीय अधिकारी श्रीमती लांडगे, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, आदिवासी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.राजुरकर, गोठणगाव सरपंच श्रीमती चांदेवार, प्रतापगडच्या सरपंच इंदू वालदे, सोसायटीचे अध्यक्ष शिबू कोवे, उपाध्यक्ष भोजराम लोगडे, पोलीस पाटील श्री.सांगोळे यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले यावेळी म्हणाले, जिल्ह्यात कमी झालेल्या पावसाचा विषय आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. जिल्ह्यातील दोन वर्षापूर्वीची धान खरेदी केंद्राची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक आहे. 3 वर्षापूर्वी धान भरडाईसाठी 10 रुपये प्रति क्विंटल दर होते आज हेच दर 40 रुपये आहे. पूर्वी सहकारी संस्थांनी खरेदी केलेला धान उघड्यावर पडून राहायचा त्यामुळे धानाचे नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायचे. आता धान केंद्राच्या अन्न महामंडळाला न देता राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला देतो. धान खरेदी केंद्रावरुन त्याची लवकर उचल करुन त्याची भरडाई करुन आपल्या जिल्ह्याचा तांदूळ राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून पोहचत आहे. त्यामुळे लाभार्थ्याला चांगला तांदूळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोदामाच्या भाड्याचे प्रलंबीत पैसे लवकर देणार असल्याचे सांगून श्री.बडोले यावेळी म्हणाले की, सोसायट्यांकडे स्वत:च्या मालकीची जर जागा असेल तर त्याठिकाणी गोदामे बांधण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. गोदामे बांधून देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून देखील धान ठेवण्यासाठी गोदामे व ओटे बांधून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे सर्वेक्षण करण्याबाबतचे निर्देश कृषि विभागाला दिल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, नुकसान भरपाई देण्यासाठी शासन तयार आहे. राज्य सरकारने आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे नियमीत कर्ज भरतात. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असे त्यांनी सांगितले.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, धानावर येणारी रोगराई आणि धान खरेदी बाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. धान पिकावर तुडतुडा या ‍किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळाली पाहिजे. येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या निश्चित मार्गी लागतील असेही त्या यावेळी म्हणाल्या.
प्रारंभी पालकमंत्री पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते मधुकर पुस्तोडे या शेतकऱ्याने खरेदी केंद्रावर आणलेल्या धानाची काट्यावर तोलाई करुन धान खरेदीचा शुभारंभ केला. कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक, सभासद व परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटीचे सचिव योगीराज हलमारे, भोदू लोगडे, भोजराम लोगडे, श्री.दरवडे यांच्यासह संस्थेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री.राजुरकर यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.हटवार यांनी मानले.