चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रात चार वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळला – उशिरा पंचनामा

0
1135
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नरबिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. उशिरा रात्रीपर्यंत मृत बिबट्याचा पंचनामा सरूच होता.
चिरोडी जंगलात येणाऱ्या पश्चिम चिरोडी वनबीट वनखंड क्रमांक ४० मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना सुमारे पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती वन कर्मचाऱ्यांनी चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर दाखल झाले. बिबट्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा, मार नसल्याने त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा, याबाबत वनाधिकारीदेखील अंदाज वर्तवू शकले नाहीत. त्यामुळे एसीएफ कविटकर यांनी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचे विच्छेदन करण्याबाबतचे कळविले. मात्र, पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नसल्याने सोमवार ३० आॅक्टोबर रोजी बिबट्याचे विच्छेदन करण्यात आले. मात्र बिबट कशामुळे दगावला याबाबत अधिक माहिती मिळु शकली नाही. दरम्यान पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे, चिरोडीचे वनपाल सुधाकर निर्मळ यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृत्यू घातपाताने तर झाला नसावा? याबाबत बिबट्याचे शरीर तपासून शंका उपस्थित केल्यात. मात्र, मृत बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला असावा, असे गृहीत धरले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी वनरक्षक सुनील येरवाड, एस.एम. कथलकर, सतिश नाईक, राजेश खडसे, प्रभाकर शेंडे, शेख रफिक, शालिक पवार, चव्हाण, मंगल यादव उपस्थित होते.

घटनास्थळी आढळले सायाळचे काटे

चिरोडी जंगलात नाल्याच्या कपारीत मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या शेजारी सायाळचे काटेदेखील आढळले आहेत. तसेच बिबट्याच्या तोंडावर दर्शनी भागात नाकाशेजारी खरचटल्याचे दिसून आले. त्यामुळे सायाळचे काटे बिबट्याला रुतले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.