अभिव्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध – शहरातुन काढण्यात आली मेणबत्ती रॅली <><> सुकाणु जनवादी संघटनेचे आयोजन

0
733
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 


विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीला बळकट करणारे प्रभावशाली शस्त्र आहे. भारतीय राज्यघटनेने हे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला दिले. परंतु, काही गटांना हे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मक्तेदारीला धोका वाटतो. कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्यावरील दुर्देवी हल्ला हा याच भावनेतून झाला. अभिव्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याचा शहरात सोमवारी सायंकाळी मेणबत्ती रॅली काढुन निदर्शने केली व निषेध करण्यात आला.
भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. वास्तविक पाहाता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीला बळकट करणारे प्रभावशाली शस्त्र आहे. आपले संविधान देशातील कोणत्याही व्यक्तीला आपले विचार प्रगट करण्याचे स्वातंत्र्य देते, त्यामुळेच अनेकवेळा संवेदनशील मुद्द्यावर सामाजिक संघर्षाची स्थितीही निर्माण झाल्याचा इतिहास फार जुना नाही. परंतु, तर्कवितर्क आणि चर्चेतून मध्यममार्ग काढल्या गेले आहेत. अर्थात, काही जहाल आणि जातीय संघटनांना हा मार्ग नको असतो, हेदेखील जगजाहीर आहे. या संघटना म्हणतील ते खरे मानणारे हे त्यांचे मित्र तर त्यांना विरोध करणारे हे त्यांचे शत्रू अशी भावना त्यांनी करून घेतलेली असते. लोकशाहीतील उदारभावच असल्या संघटनांना ताकद देत असतो आणि त्याचा नेमका गैरफायदा या संघटना किंवा राजकीय पक्ष घेत असतात. याच कारणामुळे प्रखड मत मांडणारे लेखक, समाजसुधारक यांच्यावरील हल्ल्यांना सामोरे जाण्याची दुर्देवी वेळ अनेकवेळा आली आहे. सर्वात दुर्देवाची बाब ही आहे, की समाजानेदेखील या हल्लेखोरांना एक प्रकारे प्रोत्साहनच दिले. समाज त्यांच्याविरुद्ध पेटून उठण्याऐवजी मूग गिळून बसला. या थंडपणाचेच दुष्परिणाम आज भोगावे लागत आहेत. अशा दडपशाही, हुकुमशाही धोरणाविरूध्द सुकाणु जनवादी संघटनेच्यावतीने राज्यभर 30 ऑक्टोबर रोजी मेणबत्ती रॅली काढण्यात आली. याच अनुशंगाने शहरात सुध्दा आयोजन करण्यात आले.
यावेळी कॉ. देविदास राऊत, आपचे नितीन गवळी, कॉ. विनोद जोशी, कॉ. विजय रोडगे, कॉ. सागर दुर्योधन, प्रहारचे सौरभ इंगळे, कॉ. रामदास कारमोरे, गजानन पेठे, कॉ. भिमराव बेराड, गोपाल मुरायते, मेश्राम, दादाराव घुरडे यांसह अनेक शहरवासी उपस्थित होते.