एटीएम क्लोनिंग गुन्ह्यांची पालकमंत्र्यांकडून दखल तत्पर कार्यवाहीचे निर्देश

0
605

अमरावती -बँक खातेदारांचे एटीएम क्लोनिंगद्वारे परस्पर पैसे काढून घेण्याचे गुन्हे घडत आहेत. त्याची दखल घेत पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज संबंधितांना तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले.
शासनाच्या विविध विभागांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अग्रणी बँकेच्या अधिका-यांसह काही बँकांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी क्लोनिंगच्या घटनांबाबत बँका काय कार्यवाही करत आहेत, याची माहिती घेतली व तत्काळ प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियाच्या काही खातेदारांबाबत अशा घटना घडल्याच्या तक्रारी आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे अशा घटना रोखण्यासाठी एसबीआय क्विक हे ॲप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांनी आपला पासवर्ड वेळोवेळी बदलला पाहिजे. बहुतेक सर्व बँकांच्या एटीएममध्येच पासवर्ड बदलण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. अमरावती सायबर सेलतर्फे यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बँकांचे आवाहन
एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर वेळोवेळी बदलण्याची काळजी घ्यावी. व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडावे. मोबाईलवर बँकेसंबंधी माहिती विचारणारे फोन आले तर समोरच्या व्यक्तीला आपली गोपनीय माहिती देऊ नये. तात्काळ यासंबंधी जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा सायबर क्राईम सेलकडे संपर्क साधावा, असे आवाहन बँकांतर्फे करण्यात येत आहे.