लोकसहभागातून गाळ काढणारे चुलरडोह पहिले गाव • जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ • गावाला मिळणार विविध योजनांचा लाभ

0
889
Google search engine
Google search engine

भंडारा –

 महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवणूक क्षमता पुर्न:स्थापित होण्याबराबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेवू शासनाने 5 मे 2017 रोजी गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला प्रतिसाद देत तुमसर तालुक्यातील चुलरडोह या गावाने लघुपाटबंधारे जिल्हा परिषदच्या मामा तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरुवात केली आहे. बौध्द पौर्णिमेच्या मुर्हुतावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला असून लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविणारे चुलरडोह हे नागपूर विभागातील प्रथम गाव ठरले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य श्री. तुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, ल.पा.जि.प.चे मुख्य कार्यकारी अभियंता पी. एस. पराते, तहसिलदार गजेंन्द्र बालपांडे, उपसरपंच श्री. रामटेके व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चुलरडोह येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या मामा तलावातील गाळ जिल्हा परिषद सदस्य श्री तुरकर यांच्या पुढाकाराने काढण्यात येत आहे. चुल्हारडोह हे गाव दुष्काळग्रस्त असून जलयुक्त शिवार योजना 2017-18 मध्ये या गावाचा समावेश करण्यात आला आहे. या दुष्काळग्रस्त गावातील लोकांनी लोकसहभागातून धरणातील गाऴ काढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत सर्व उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतूक केले. शासनाच्या सर्व लोकाभिमुख योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले.
तलावामधून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात सुमारे 50 टक्के घट येणार आहे. चुलरडोहने लोकसहभागातून मामा तलावातील गाळ काढण्याचा आदर्श घालवून दिला असून जिल्हयातील अन्य तलावातील सुध्दा गाळ लोकसहभागातून काढण्यात येईल असेही ते म्हणाले. सोबतच तलावाचे खोलीकरण झाल्यामुळे शेतीसोबतच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल असे ते म्हणाले. यावेळी गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.