अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी 10 कोटी निधी वर्ग

525

मुंबई – एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण, आदिवासी तसेच नागरी क्षेत्रातील 553 प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका यांना सन  2017-18 या आर्थिक वर्षात गणवेषासाठी अनुदान मंजूर करुन वितरीत करण्यात आले आहे. या वर्षी गणवेशासाठी 10.68 कोटी रुपये रक्कम देण्यात येत आहे.

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निधी वितरीत करण्यास नुकतीच मान्यता दिली होती. निधीचे वितरण तातडीने करावे, असे आदेश त्यांनी आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार हा निधी अंगणवाडी सेविकांना गणवेश खरेदीसाठी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. याचा लाभ राज्यातील एकूण 95 हजार 928 अंगणवाडी सेविका, 92 हजार 360 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 64 मिनी अंगणवाडी सेविकांना होणार आहे. याकरिता आर्थिक तरतूद 10 कोटी 68 लाख 91 हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करुन प्रकल्पस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. एकात्मिक बालविकास सेवा यांजनेअंतर्गत राज्यातील एकूण 553 प्रकल्पस्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याबाबतचे आदेश संबधित कार्यालयांना दिले आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कमलाकर फंड यांनी दिली.

अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना या निधीमधून स्वत: गणवेश खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

जाहिरात