विदर्भातील पहिली बायोलॅब महिलांच्या हाती – पाचशे टन उत्पादन, एक कोटीची उलाढाल

0
836
Google search engine
Google search engine

यवतमाळ –

 

शेतामध्ये वापरण्यात येणारी रासायनिक खते आणि किटकनाशकांमुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे शेतक-यांचा खर्च जास्त व उत्पादन कमी अशी अवस्था पाहावयास मिळते. शिवाय ही किटकनाशके शेतक-यांच्याच जीवावर उठली आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चावर आधारीत आणि विषमुक्त म्हणून जैविक शेती हा पर्याय उभा राहत आहे. या शेतीला लागणारी खते, किटकनाशके जैविक पध्दतीने निर्माण करण्यासाठी संगिता सव्वालाखे यांनी विदर्भ बायोटेक लॅब उभी केली आहे. विदर्भातील ही पहिलीच बायोलॅब असून आजघडीला पाचशे टन उत्पादन व वार्षिक एक कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत आहे. यवतमाळ औद्योगिक परिसरात असलेल्या या लॅबमध्ये संपूर्ण महिला कर्मचारी आहे.
संगिता दीपक सव्वालाखे (काहारे) यांनी कृषी किटकशास्त्रात पदव्युत्त्तर (एम.एसस्सी) शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे 1992 मध्ये या विषयात शिक्षण घेणा-या त्या एकमेव महिला होत्या. बीएसस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर त्यांना चंद्रपुर तालुक्यातील सिंदेवाही येथे सहा महिने शेतावर प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली. रासायनिक पध्दतीमुळे शेतीचे कसे नुकसान होत आहे, हे अनुभवल्यानंतर त्यांनी जैविक क्षेत्रातच काम करायचे, असा निर्धार केला. त्यानुसार 1995 मध्ये घरातील तीन खोल्यांपैकी एका खोलीमध्ये लॅब सुरू केली. ट्रायकोकार्ड हा त्यांचा पहिला प्रकल्प होता. 23 वर्षांपासून या क्षेत्रात त्या कार्यरत असून 2009 पासून यवतमाळ येथील औद्योगिक क्षेत्र परिसरात त्यांनी विदर्भ बायोटेक लॅब म्हणून स्वतंत्र युनीट सुरू केले.
या युनिटमध्ये एकूण 11 प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होते. बीज प्रक्रियेपासून तर उत्पादन हाती येईपर्यंत सर्व प्रकारची उत्पादनांची येथे महिलांकडून निर्मिती केली जाते. यात ट्रायकोडर्मा 40 ते 50 टन आणि उर्वरीत उत्पादने प्रत्येकी 20 ते 25 टन तयार केले जातात. शिवाय दरवर्षी 4 ते 5 हजार लिटर द्रवरूप औषधांचीसुध्दा येथे निर्मिती होते. रासायनिक खतांच्या तुलनेत अतिशय स्वस्त दारात ही खते आणि किटकनाशके पावडर व द्रवरुप स्वरुपात ते शेतक-यांना उपलब्ध देण्यात येत आहे. या उत्पादनात ट्रायकोडर्मा, वंडर, ॲक्टीव्ह, थंडर, क्रायसोपर्ला, ट्रायकोग्रामी, उत्क्रांती, मॅलाडा आदींचा समावेश आहे. ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे जिब्रालिक ॲसीड, एनझाईम्स् वापरण्याची गरज नाही. खरीप हंगामात महिनाभर पाऊस नाही आला तरी ते झाड जिवंत राहते, असे त्यांचे निरीक्षण आहे. यवतमाळ येथे निर्मित त्यांच्या या उत्पादनांना रासायनिक शेती करणा-या मोठमोठ्या शेतक-यांसह राज्यातील 7 ते 8 हजार शेतकरी, टाटा ट्रस्ट, स्वामिनाथन फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, बजाज फाऊंडेशन तसेच निमशासकीय संस्था यांच्याकडून मागणी आहे. शेतीच्या हंगामात या युनिटमध्ये एकाचवेळी 30 ते 35 महिला कार्यरत असतात.
कमी खर्चात जैविक खते, जैविक किटकनाशके आणि औषधी तयार करून शेतक-यांच्या हातात दोन पैसे जास्त कसे राहील, याचा विचार करून त्यांनी हे क्षेत्र निवडले आहे. घरच्या घरी खते कशी तयार करावीत, कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावीत, याबाबत त्या शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात. तसेच एकाच प्रकारच्या परंपरागत पिकांवर शेतक-यांनी अवलंबून राहू नये. वर्षभर पैसे येत राहतील, या दृष्टीने विचार करून शेती करावी, असे त्या शेतक-यांना आवर्जुन सांगतात. जैविक शेतीबाबत व्याख्याने देण्यासाठी त्यांना राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातूनसुध्दा आमंत्रित केले जाते. विशेष म्हणजे विनामुल्य त्या याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करीत आहेत. कृषीक्षेत्रात मिळविलेल्या पदव्या आणि संशोधनाचा उपयोग शेतक-यांच्या हितासाठी व्हावा, यासाठी नोकरीच्या मागे लागली नाही. याबाबत मला दोन्ही घरून भरपूर पाठिंबा मिळाला, असे त्या आवर्जुन सांगतात.
कृषी क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या कार्याचा गौरव राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरसुध्दा झाला आहे. आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक काँग्रेस व लंडनच्या ओव्हरसीज डेव्हलपमेंटचे त्यांना सदस्यत्व मिळाले आहे.