सांगलीत ‘खाकी’ला काळिमा फासणारी घटना

0
1086
Google search engine
Google search engine

 

 

केवळ दोन हजार रुपये व मोबाईल चोरणारा तरुण अनिकेत अशोक कोथळे (वय 26, रा. भारतनगर, कोल्हापूर रोड) याचा पोलिसांनीच घातपात केला असल्याचा नातेवाइकांचा आरोप खरा झाला. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत कोथळेचा मृत्यू झाला. यानंतर निर्ढावलेल्या या पोलीस पथकाने थंड डोक्याने कोथळेचा मृतदेह आंबोली येथे नेऊन जाळला. अर्धवट जळाल्याने त्यांनी तो दोनदा जाळला. आरोपीच्या साथीदाराला बरोबर घेऊन पळून जाण्याचा बनाव रचला पण एका फोनमुळे सर्वकाही प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वत: या प्रकरणी लक्ष घालून पीएसआय कामटेसह सहाजणांविरोधात खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून झालेल्या प्रकाराची कबुली दिली. कोट्यवधी रुपये हडपणारे, गुन्हेगारांना आश्रय देणारे, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरणारे म्हणून आता सांगली पोलिसांची प्रतिमा राज्यभर बदनाम झाली आहे.

कवलापूर येथील अभियंता संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अनिकेत अशोक कोथळे आणि अमोल सुनील भंडारे यांना शहर पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांनी सोमवारी रात्री 2.30 वाजणेच्या दरम्यान चौकशीवेळी पलायन केल्याची माहिती दिली होती. यातील अमोल भंडारे यास निपाणी येथे अटक केल्याचेही पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते तर अनिकेत कोथळे हा अद्याप गायब असल्याचेही पोलीस म्हणत होते. परंतु अनिकेतच्या नातेवाइकांनी त्याचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करून शहर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मारला होता. आ. सुधीरदादा गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन सत्य उजेडात आणण्याची मागणी केली होती. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कोथळेला हजर न केल्यास मला मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल अशी तंबीच आ. गाडगीळ यांनी दिली होती. त्यामुळे सारी यंत्रणा झपाटून कामाला लागली होती. एरवी 24 तास सुरू असणारे सीसीटीव्ही संशयितांच्या पलायनावेळीच कसे बंद होते असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. या घटनेनंतर युवराज कामटे यांच्यासह त्यांच्या तपास पथकातील सर्वांचेच मोबाईल बंद होते. त्यामुळे शंकेला वाव मिळाल्याने या प्रकरणातील ‘पोलिसांच्या’ शोधाठीच पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ही घटना पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे कोथळे व भंडारे यांना चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

त्या दोघांकडे चौकशी केली. थर्ड डिग्रीचा वापर केला. उलटे टांगणे, पाण्यात डोके बुडविणे यातच कोथळेचा जागीच मृत्यू झाला. साधारणत: 9.15 वाजणेच्या दरम्यान ही घटना घडली. तो मृत झाल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची डाळ शिजली नाही.