जिल्ह्यात 1 ते 7 जुलै दरम्यान लावणार 8 लाख 50 हजार झाडे अधिकाधिक लोकसहभागातून वृक्षारोपण मोहिम यशस्वी करु – जिल्हाधिकारी श्री अभिजीत बांगर

0
623
Google search engine
Google search engine
मोहिमेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल वन मंत्र्यांकडून अभिनंदन

अमरावती-

 राज्यातील हरित पट्‌ट्यात वाढ व्हावी या हेतूने शासनाने राज्यात यंदा 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, अमरावती जिल्ह्यात 8 लाख 50 हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. शासनाच्या जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून स्वयंसेवी संस्था, खासगी संस्थांचे सहकार्य मिळवत अधिकाधिक लोकसहभागातून ही मोहिम यशस्वी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज दिली.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोहिमेच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांच्याशी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी श्री. बांगर यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली. या मोहिमेसाठी अमरावती प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
श्री. बांगर म्हणाले की, मोहिमेत वन खात्यातर्फे 2 लाख 67 हजार झाडे, तर सामाजिक वनीकरण व इतर विभागांतर्फे 5 लाख 82 हजार झाडे लावण्यात येतील. वृक्षारोपणाच्या उद्दिष्टानुसार आजमितीला साडेसात लाख झाडांसाठी जमीन उपलब्ध असून, उर्वरित एक लाख झाडांसाठी लवकरच जागा निश्चित होईल.
लागवडीसाठी खड्डयांचे काम वनविभागाकडून 100 टक्के, सामाजिक वनीकरण विभागाकडून 80 टक्के झाले असून ग्रामपंचायतींकडून कार्यवाही सुरु आहे. त्याबाबत संकेतस्थळावर माहिती अपलोड केली जात आहे. जिल्ह्यात उद्दिष्टांप्रमाणे रोपांची उपलब्धता आहे. मोहिमेसाठी नियुक्त जिल्हास्तरीय समितीच्या 9, तालुका समितीच्या 14 बैठका व 839 ग्रामसभा झाल्या आहेत. मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी माहिती पुस्तिका लवकरच प्रसिद्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री. बांगर पुढे म्हणाले की, गतवर्षीच्या वृक्षारोपणापैकी झाडे जगण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. हे प्रमाण अधिक वाढण्यासाठी यंदा अधिक काळजी घेण्यात येईल. मोहिमेसाठी जिल्ह्यात पेसा निधी व नरेगा याद्वारे निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. वणव्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठीही प्रयत्न होत आहेत. दुतर्फा रोप वनांसाठी ट्रीगार्डस् उपलब्ध करुन दिले जात आहेत. चराई बंदीसाठीही लोकसहभाग वाढविण्याचे प्रयत्न आहेत. खाजगी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. अमरावती शहरात महापालिकेतर्फे 5 हजार झाडे लावण्यात येणार आहेत.