कॉंग्रेसचे आ. विरेंद्र जगताप यांची खाजगी गोडाऊनमध्ये जाऊन खरेदी केलेल्या तुरीची चौकशी होणार – तहसिलदारांचे आदेश. संतप्त शेतकऱ्यांची बाजार समितीवर धडक

0
805

बाजार समितीत संचालक मंडळ, सचिव व व्यापाऱ्यांनी संगणमताने अनियमितता केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
सि.सि.टी.व्ही. फुटेज जप्त करून चौकशीचीही मागणी


चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)


चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी धडक दिली. राज्य शासनाच्या वतीने नाफेड अंतर्गत तूर खरेदी सुरु आहे. यामध्ये 22 एप्रिल तारखेच्या आत आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्याचे आदेश आहे. मात्र असं असतांना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संचालक मंडळाच्या संगणमताने पदाचा गैरवापर करत संचालकांच्या तुरीची खरेदी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असुन आमदार विरेंद्र जगताप यांची 300 पोते तुर खाजगी गोडाऊन जाऊन खरेदी करण्यात आल्यामुळे त्याचीही चौकशी करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी करीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव चेतन इंगळे यांच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच तहसिल कार्यालयात जाऊन तहसिलदार बी.ए. राजगडकर यांनाही निवेदन देण्यात आले. यानंतर तहसिलदार यांनी तत्काळ आदेश देत आमदारांच्या तुरीचे चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.


         स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडची तुर खरेदी सुरू असुन बाजार समितीच्या मोकळ्या जागेवरच शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तुर उन्हाचा तडाखा सहन करीत अनेक दिवसांपासुन पडुन आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या तुरीचे पोते उन्हामुळे फुटुन ते माती सोबत मिश्रीत झाले. तसेच उन्हामुळे ही तुर काळीसुध्दा पडुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशातच आता ढगाळ वातावरण निर्मान झाले असुन कधीही अवकाळी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी शेडचे बांधण्यात आले आहे. मात्र या शेडमध्ये अनेक दिवसांपासुन व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात आला आहे. अनेकवेळा सांगुनसुध्दा अद्यापही शेड व्यापाऱ्यांनी खाली केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी शेडमधील व्यापाऱ्यांच्या मालाची जप्ती करण्याची मागणी करीत बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. मात्र यानंतर बाजार समितीच्या गलथान कारभाराचे नमुने थांबण्याचे नाव घेत नसुन पुन्हा शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिवांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सचिव चेतन इंगळे यांना आ. विरेंद्र जगताप यांची खाजगी गोडाऊनमध्ये जाऊन तुर कोणत्या नियमाने खरेदी केली यासह अनेक प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सचिवांनी दिले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयात जाऊन तहसिलदार बी.ए. राजगडकर यांना निवेदन दिले. यामध्ये सोनगाव येथील गजानन आमले नामक काँग्रेस कार्यकर्त्यांची तूर 27 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत आली आसंतांना त्याची खरेदी कशी करण्यात आली ? याची चौकशी करा, कॉंग्रेसचे नेते गणेश आरेकर, ज्योती आरेकर, राधिका प्रवीण घुइखेडकर, प्रीती प्रशांत घुइखेडकर यांची तूर मार्केटमध्ये नसतांना त्यांची नावे 22 एप्रिलच्या आतमध्ये असलेल्या यादीत कशी काय आली त्यानंतर त्यांची तूर आता 26 एप्रिल रोजी मार्केटमध्ये आल्यानंतर तात्काळ खरेदी कशी करण्यात आली याची चौकशी करा, स्थानिक लोकप्रतिनिधी आ.वीरेंद्र जगताप यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात न आणता त्यांच्या खासगी गोडाऊन वर जाऊन 300 पोते तूर कोणत्या नियमाने खरेदी करण्यात आली, 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सि.सि.टी.व्ही. फुटेज जप्त करण्यात यावे आदी मागण्या सामाविष्ट करण्यात आल्या आहे. चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात संचालक मंडळ आपल्या पदांचा गैरवापर करत गैरप्रकार करत असल्याची शक्यता आहे त्यावरून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आल्याची माहीती एका शेतकऱ्याने दिली. यामध्ये दोषी असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे तसेच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी बबनराव गावंडे, रविंद्र उपाध्ये, प्रशांत कांबळे, प्रमोद अडसड, रूपराव शेलोकार, रमेश भोंडे, रामेश्वर किन्हीकर, संदिप सोळंके, अमोल अडसड, अक्षय जामदार, राजेश डहाके, विवेक चौधरी यांसह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.

पुढील १० दिवसांत येणार निकाल

बाजार समितीत सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबची चौकशी सुरू झालेली आहे. तहसिलदार यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असुन  शेतकऱ्यांनी निवेदनामध्ये केलेल्या मागण्यांची चौकशी करून चांदुर रेल्वे निबंधक कार्यालयातील अधिकारी याचा येत्या 10 दिवसात निकाल देणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र ही चौकशी निप:क्ष होणार की राजकीय दबावाखाली होणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.