बाजार समितीतील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या मालाची जप्ती करा संतप्त शेतकऱ्यांचा सचिवांच्या कार्यालयात ठिय्या अनेक दिवसांपासुन शेतकऱ्यांचा माल उघड्यावरच

0
575

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)


      गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची तूर बाजार समितीच्या आवारात पडून आहे. सद्या पावसाचे वातावरण निर्माण झाले असून सुद्धा अजूनपर्यंत हजारो क्विंटल तूर बाजार समितीच्या आवारातच आहे. व्यापाऱ्यांची तूर मात्र शेडमध्ये असुन यावर कोणतीच कारवाई बऱ्याच  दिवसांपासुन न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी बाजार समितीच्या सचिवांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून व्यापाऱ्यांच्या मालाची जप्ती मागणी केली. सचिवांनी तत्काळ शेड खाली करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आहे.
     स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडची तुर खरेदी सुरू असुन बाजार समितीच्या मोकळ्या जागेवरच शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तुर उन्हाचा तडाखा सहन करीत अनेक दिवसांपासुन पडुन आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या तुरीचे पोते उन्हामुळे फुटुन ते माती सोबत मिश्रीत झाले. तसेच उन्हामुळे ही तुर काळीसुध्दा पडुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशातच आता ढगाळ वातावरण निर्मान झाले असुन कधीही अवकाळी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी शेडचे बांधण्यात आले आहे. मात्र या शेडमध्ये अनेक दिवसांपासुन व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात आला आहे. अनेकवेळा सांगुनसुध्दा अद्यापही शेड व्यापाऱ्यांनी खाली केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी शेडमधील व्यापाऱ्यांच्या मालाची जप्ती करण्याची मागणी करीत बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सविस्तर चर्चा केल़्यानंतर शेतकऱ्यांनी सचिवांना निवेदन दिले. यानंतर सचिवांनी लवकरच शेड खाली करवुन घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिल्यानंतर ठिय्या आंदोलनाचा सांगता झाल्याचे समजते. मात्र आश्वासनाची पुर्तता कीती लवकर होणार हे येणारा काळच सांगेल.
     यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.